(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आठवण वीर योद्ध्याची; कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा थरकाप उडवणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा
विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता. पॉईंट 5140 वर ताबा मिळवल्यानंतर टीव्हीवर 'ये दिल मांगे मोर' म्हणत त्यांनी संपूर्ण भारतीयांचं मन जिंकल होतं.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान कारगिल युद्धाबाबत ज्या अभिमानाने आपण बोलतो, त्या युद्धातील खरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज 21 वी पुण्यतिथी आहे. 1999 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शत्रूशी लढताना कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं होतं. कॅप्टन बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला होता. त्यांनी 6 डिसेंबर 1997 रोजी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली होती. भारतीय सैन्यातील जम्मू आणि काश्मीर 13 व्या बटालियनमधून ते देशसेवा करत होते.
कारगिल युद्धाच्या काळात सर्वात कठीण टोलिंग पर्वत रांग आणि 4875 पॉईंट ताब्यात घेण्यात कॅप्टन बत्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. कारगिल युद्धातील सर्वात महत्वाच्या लढायांपैकी एक या लढाया होता. कॅप्टन बत्रा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य त्यांचा 'शेर शाह' असा उल्लेख करतात.
लेफ्टनंट विक्रम बत्रा यांनी हम्प आणि रॉक नाब शिखरांवर ताबा मिळवून शत्रूच्या सैनांवर मोठा आघात केला होता. विक्रम बत्रा यांच्या या पराक्रमासाठी त्यांना पदोन्नती देत कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पदोन्नतीनंतर विक्रम बत्रा यांनी श्रीनगर-लेह मार्गाजवळचा 5140 पॉईंट शत्रूच्या ताब्यातून मुक्त केला होता. विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता. पॉईंट 5140 वर ताबा मिळवल्यानंतर टीव्हीवर 'ये दिल मांगे मोर' म्हणत त्यांनी संपूर्ण भारतीयांचं मन जिंकल होतं.
पॉईंट 5140 वर यशस्वीरित्या ताबा मिळवल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर 4875 पॉईंटवर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट अनुज नैय्यर आणि लेफ्टनंट नवीन यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कामगिरीवर निघाले. 4875 पॉईंट समुद्र सपाटीपासून 17 हजार फुट उंचीवर आहे. लेफ्टनंट अनुज नैय्यर यांच्या मदतीने विक्रम बत्रा यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. मात्र त्याच वेळी लेफ्टनंट नवीन यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. आपल्या सहकाऱ्यावर हल्ला झालेला पाहून विक्रम बत्रा स्वत: नवीन यांच्या समोर ढाल बनून उभे राहिले. मात्र यावेळी शत्रूची एक गोळी त्यांच्या छातीत लागली. हाच तो 7 जुलै 1999 चा दिवस होता ज्यावेळी अवघ्या 24 वर्षांचे कॅप्टन विक्रम बत्रा देशासाठी शहीद झाले.
भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली कॅप्टन विक्रम बत्रा यांना सर्वोच्च सैन्य सन्मान मरणोत्तर परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी भारतीय सैन्याने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याचा व्हिडिओ शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.#21YearsofKargil#MushkohDay,when most conspicuous bravery of Capt #VikramBatra, PVC(P) & Rfn Sanjay Kumar, PVC in face of enemy facilitated capture of Pt 4875 by 13 JAK RIF; both awarded #PVC,a rare & distinct first in #IndianArmy history.@adgpi Tribute "#IAmBack"- @MajorAkhill pic.twitter.com/w3vvyIJ73w
— NorthernComd.IA (@NorthernComd_IA) July 7, 2020