(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratan Tata Passed Away: कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी रतन टाटांनी दाखवलेली विमान उडवण्याची तयारी, पण...; नेमकं काय घडलेलं 'त्या' दिवशी?
Ratan Tata: रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवडच हरपलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते.
Ratan Tata Passed Away in Mumbai: भारतीय उद्योगविश्वाचे महर्षि रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झालंय. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रतन टाटांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी उद्योग विश्वात आपल्या अतुलनीय योगदानाचा अमूल्य ठसा उमटवलाय. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवडच हरपलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते.
1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. रतन टाटा हे केवळ चांगले उद्योगपतीच नव्हते, तर ते एक चांगले माणूसही होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची ते खूप काळजी घ्यायचे, याचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो. नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस ही त्यांची ओळख होती. कंपनीमध्ये कर्मचारी कोणत्या पदावर आहे, हे त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं, पण तो माणूस आहे, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. एक किस्सा सांगितला जातो की, रतन टाटा एकदा आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला तयार झाले होते.
2004 ची ही घटना. पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची अचानक तब्येत खालावली. त्यांना आधी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्यांना तातडीनं मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. रविवार असल्यानं डॉक्टरांना एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं शक्य नव्हतं. याबाबत रतन टाटा यांना सांगितल्यावर त्यांनी कंपनीचं विमान स्वतः उडवण्यास होकार दिला. रतन टाटा यांच्याकडे पायलटचा परवाना होता. पण, त्याचवेळी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आणि प्रकाश यांना तातडीनं उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 50 वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केल्यानंतर प्रकाश 2012 मध्ये निवृत्त झाले.
ट्रेंड पायलट होते 'रतन टाटा'
देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक असलेले रतन टाटा हे प्रशिक्षित पायलट होते आणि त्यांच्याकडे विमान उडवण्याचा परवानाही होता. त्याच्याकडे Dassault Falcon 2000 प्रायव्हेट जेट देखील होतं, ज्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते एका फायटर प्लेनच्या कॉकपिटमध्ये बसलेले पाहायला मिळालं होतं. हा फोटो 2011 चं आहे, जेव्हा रतन टाटा यांनी बंगळुरू एअरशोमध्ये बोईंगच्या F-18 सुपर हॉर्नेट विमानातून उड्डाण केलं होतं. 28 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांच्या 82 व्या वाढदिवशी त्यांनी हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
रतन टाटा यांनी 2007 मध्ये अमेरिकन फायटर प्लेन F-16 मधून उड्डाण केलं होतं. त्यानंतर वयाच्या 69 व्या वर्षी अमेरिकन विमान उडवणारे ते सर्वात वयोवृद्ध भारतीय नागरिक होते. रतन टाटा यांना विमान उडवण्याची आवड वारसानं मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांचे गुरू जेआरडी टाटा हे देशातील पहिले परवानाधारक पायलट होते. जेआरडी टाटा यांनी पहिल्यांदाच कराचीहून मुंबईला विमान उडवलं. त्यांनीच टाटा एअरलाईन्स सुरू केली. नंतर त्याचे नाव एअर इंडिया झालं आणि त्याचं राष्ट्रीयीकरण झालं. त्यानंतर, एअर इंडिया आता टाटा समूहाकडे परतली आहे.
रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी
रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची अनेक मागणी होती. काही वर्षांपूर्वी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata या हॅशटॅगसह एक मोहीम सुरू करण्यात आली होती. ज्यात त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर रतन टाटा यांनी लोकांकडे ही मोहीम थांबवण्याची मागणी केली आणि ते स्वत:ला भारतीय म्हणून भाग्यवान समजत असल्याचं सांगितलं. रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :