(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir Pran Pratishtha: क्रेनच्या मदतीनं राम मंदिर परिसरात पोहोचली रामललाची मूर्ती; आज गर्भगृहात स्थापना
अयोध्येत रामललाच्या अभिषेकची तयारी जोरात सुरू आहे. आता बुधवारी राम मंदिर परिसरात रामललाची मूर्ती पोहोचली आहे. गुरुवारी ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.
Ram Mandir Pran Pratishtha: नवी दिल्ली : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामललाच्या अभिषेकचा मुहूर्त जवळ आला आहे. अयोध्येत भक्तांची रेलचेल वाढली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी सुरू असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी (17 जानेवारी) या विधींच्या दुसऱ्या दिवशी रामललाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात आली होती. अशातच आज मूर्ती मंदिरातील गर्भगृहात ठेवली जाणार आहे.
बुधवारी (17 जानेवारी) या विधींच्या दुसऱ्या दिवशी रामललाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात आली. विवेक सृष्टी ट्रस्टच्या ट्रकमधून रामललाची मूर्ती राम मंदिरात नेण्यात आली. मंदिराच्या आवारात मूर्ती नेण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी (18 जानेवारी) ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. आता ही मूर्ती मंदिरातील गर्भगृहाच्या दारात नेण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामाची मूर्ती घेऊन ज्यावेळी ट्रक निघाला त्यावेळी ट्रकच्या मार्गात जिकडे तिकडे लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच, प्रभू श्रीरामाचा जयघोषही सुरू होता. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती, त्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत.
रामराज्य परत येईल : संत
विवेक सृष्टी ट्रस्टकडून अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती नेली जात असताना पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका संतांनी म्हटलं की, आम्ही खूप आनंदी आहोत. आमचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आता पुन्हा राम राज्य येईल, जे पूर्वी होतं ते कलियुगातून निघून जाईल, मग आता खरं (युग) येईल... रामराज्य पुन्हा येईल."
आदल्या दिवशी रामललाची प्रतिकात्मक चांदीची मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली. तसेच, मूर्तीनं मंदिराभोवती प्रदक्षिणा सोहळाही पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी जबाबदार असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार अभिजित मुहूर्तावर सर्व शास्त्रीय परंपरांचं पालन करून अभिषेक कार्यक्रम होणार आहे. अभिषेक करण्यापूर्वीचे शुभ विधी 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत सुरू राहतील.
मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरातील अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होणार असून तो एक वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
अयोध्येतील भव्य राम मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली
कर्नाटकातील म्हैसूर येथे राहणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामललाची मूर्ती बनवली आहे. राम मंदिर ट्रस्टनं स्थापनेसाठी योगीराजांनी बनवलेल्या मूर्तीची निवड केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, अरुण योगीराज यांच्या पत्नी विजया यांनी सांगितलं की, मूर्ती बनवताना योगीराज यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. दगडाचा धारदार तुकडा त्याच्या डोळ्यात घुसला होता आणि तो ऑपरेशनद्वारे काढण्यात आला. त्यांनी सांगितलं की, वेदना होत असतानाही तिचा पती अनेक रात्री झोपला नाही आणि रामललाची मूर्ती बनवण्यात मग्न राहिला. योगीराजांनी बनवलेल्या मूर्तीची निवड झाल्याबद्दल कुटुंबीयांनी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.