Akasa Airlines : राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा एअर'ला हवाई वाहतूक मंत्रालयाची NOC, पुढच्या वर्षी सेवा सुरु होण्याची शक्यता
Akasa Airlines : राकेश झुनझुनवाला सुरु करत असलेल्या अकासा एअरलाईन्सकडून येत्या चार वर्षात 70 विमाने खरेदी करण्यात येणार आहेत.
मुंबई : हवाई वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर' या एअरलाईन्सला ना हरकत प्रमाणपत्रक दिलं आहे. कंपनीने सोमवारी या संबंधित एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ही नवीन एअरलाईन्स 2022 पर्यंत सुरु करण्याचं लक्ष असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आकाश एअर मध्ये राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांची भागिदारी आहे.
शेअर मार्केटमधील बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. भारतामध्ये येत्या काळात लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्यासाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार वर्षात 70 विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यांच्या आणि मोदींच्या या भेटीची माध्यमांत आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होत.
येत्या चार वर्षात राकेश झुनझुनवाला आपल्या या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. भारतीय लोकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी राकेश झुनझुनवाला विमान सेवा सुरु करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं की, या नवीन विमान कंपनीसाठी ते 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून एअरलाईन्स कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला 40 टक्के शेअर्स आपल्याकडे ठेवणार आहेत. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून या विमान सेवा कंपनीला एनओसी मिळेल असंही त्यांनी सांगितलं.
राकेश झुनझुनवाला यांच्या विमान सेवा कंपनीचे नाव आकाश एयर (Akasa Air) असं असणार आहे. या नवीन एअरलाईन्समध्ये डेल्टा एयरलाईन्सचे माजी सीनियर एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची टीम काम करणार आहे. एकाच वेळी 180 लोक विमानातून प्रवास करु शकतील अशा पद्धतीच्या विमानांची या कंपनीकडून चाचपणी होत आहे.
भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या शेअर बाजारातील दिग्गजांच्या रणनितीवर सामान्य गुंतवणूकदारांची नजर असते. अनेक गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात.
जगभरातील विमान सेवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला असून गेल्या दोन वर्षांपासून त्या बंद आहेत. अशा काळात राकेश झुनझुनवाला यांनी विमानसेवेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या :
- Rakesh Jhunjhunwala meets PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली BIG BULL राकेश झुनझुनवालांची भेट; झुनझुनवालांचा चुरगाळलेला शर्ट पाहून नेटकरी हैराण
- Mumbai Drugs Case : समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत? NCB च्या झोनल डायरेक्टरांनी दाखल केली तक्रार
- Search Shodhgram Project : 'सर्च' संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला राज्यपालांची सदिच्छा भेट