Raja Raghuvanshi Case: राज अन् सोनमने उघडली 'स्वतःची' कंपनी; त्याच खात्यातून दिलेली सुपारी, राजा रघुवंशी हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा
Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. राजाचा भाऊ विपिनने दावा केला आहे की राज आणि सोनम यांनी एक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी राजची आई चुन्नी देवी यांच्या नावाने उघडण्यात आली होती.

Raja Raghuvanshi Case: इंदूरच्या गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात राजा रघुवंशीच्या भावाने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राजा रघुवंशीचा भाऊ विपीन रघुवंशी याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, हत्या होण्याच्या काही दिवस आधी राजा आणि सोनमने एक कंपनी सुरू केली होती, जी त्याच्या आई चुन्नी देवी यांच्या नावावर होती. या घटनेआधी कंपनीच्या खात्यात 7 ते 8 लाख रुपये जमा झाले होते आणि याच पैशांचा वापर सोनमने हत्येसाठी केल्याचा आरोप विपीनने केला आहे.
सोनमचा पूर्वनियोजित कट?
विपीनच्या मते, राजा आणि सोनम शिलॉन्गला रवाना होण्यापूर्वीच सोनमने तिचे तीन साथीदार विकास, आकाश आणि आनंद यांना पैसे दिले होते, जे बहुधा त्या कंपनीच्या खात्यातून काढले गेले. त्यामुळे, संपूर्ण हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा विश्वास राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आता रघुवंशी कुटुंबीय आरोपींच्या नार्को टेस्टसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
आठवा आरोपी लोकेंद्र तोमर
या प्रकरणात आता आठव्या आरोपीचे नाव लोकेंद्र तोमर समोर आले आहे. शिलॉन्ग पोलिस लोकेंद्र तोमरच्या शोधात आहेत, कारण सोनमने फरार असताना इंदूरच्या देवास नाका परिसरातील फ्लॅटमध्ये त्याच्याकडे आसरा घेतला होता. प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्स आणि सिक्युरिटी गार्ड बलवीर अहिरवार यांच्या अटकेनंतर आठव्या आरोपीचा तपास सुरू झाला आहे. सिलोमने चौकशीत कबूल केलं की लोकेंद्र तोमरने त्या फ्लॅटमधून एक काळा बॅग हटवून जाळण्याचा दबाव त्याच्यावर टाकला होता. त्या बॅगमध्ये पिस्तूल, रोख रक्कम आणि इतर पुरावे होते. बॅग जाळल्यानंतर पोलिसांनी त्याचे अवशेष जळालेला मोबाइल, प्लास्टिकचे तुकडे इत्यादी जप्त केले आहेत.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सिलोम आणि बलवीरला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले असून त्यांना 28 जूनपर्यंत ट्रांजिट रिमांड मंजूर झाली आहे. दरम्यान, सोनमचा लॅपटॉपही सिलोमने आपल्या पत्नीच्या मदतीने टाकून दिला होता.
तपासाची पुढची दिशा
शिलॉन्ग पोलीस आणि इंदूर क्राईम ब्रांच यांच्यात समन्वय साधून सिलोम आणि बलवीरला घटनास्थळी नेले जात आहे. आता सर्वांचं लक्ष लोकेंद्र तोमरच्या अटकेकडे लागले आहे. सोनमने हा कट किती नियोजनबध्द पध्दतीने रचले होते ते तपशिलांमधून समोर येत आहे.
आतापर्यंत या प्रकरणात कोणती माहिती समोर
राजा रघुवंशी याची 23 मे रोजी हत्या करण्यात आली आणि 2 जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. हत्येच्या 17 दिवसांनंतर सोनम पोलिसांसमोर शरण आली, त्यानंतर इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या हत्येने केवळ इंदूरमध्येच नाही तर देशभरात खळबळ उडाली. आता मिस्ट्री गर्ल अलकाच्या प्रवेशामुळे या प्रकरणात आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला असा संशय आहे की, सोनमने हा गुन्हा एकटीने केला नसेल. पोलीस आता या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाहीत तर यात खोलवरचा कट असण्याची शक्यताही तपासत आहेत. येत्या काळात अलका आणि सोनममधील मैत्रीबाबत धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता आहे.























