Punjab Chief Minister : मुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहळ्याला भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांची उपस्थिती, सात वर्षांनंतर झाली भेट
Punjab New Chief Minister : भगवंत सिंग यांचे गाव असलेल्या खटकड़ कलां येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
![Punjab Chief Minister : मुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहळ्याला भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांची उपस्थिती, सात वर्षांनंतर झाली भेट Punjab Bhagwant Mann's son and daughter attended the swearing-in ceremony of the Chief Minister after seven years Punjab Chief Minister : मुख्यमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहळ्याला भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांची उपस्थिती, सात वर्षांनंतर झाली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/16/08092b4a65f3818ecdc919857488d8b8_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Punjab New Chief Minister Bhagwant Mann : यशापयशाच्या पलीकडे आपलं एक घर असतं, त्या घरातली माणसं जर तुमच्या यशानं आनंदी असतील आणि तुमच्या आनंदात ते सहभागी असतील. तरच त्या यशाला किंमत असते. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा आनंद आज द्विगुणित झालाय. कारण सात वर्षांपासून दुरावलेली त्यांची दोन्ही मुलं आज त्यांना भेटलीत. आज भगवंत मान यांनी पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला एकवीस वर्षांची सीरत कौर आणि 17 वर्षाचा दिलशान ही दोन्ही मुलं उपस्थित होते.
2015 साली भगवंत मान यांनी पत्नी इंद्रपीत कौर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ही दोन्ही मुलं आपली आई इंद्रप्रीत कौर यांच्यासोबत अमेरिकेला स्थायिक झाली. आज सात वर्षांनंतर ही दोन्ही मुलं आपल्या वडिलांच्या शपथग्रहण सोहळ्याला खटकड़ कलां गावात पोहोचली.
भगवंत मान यांनी पंजाबमध्ये मोठा विजय खेचून आणला. त्यानंतर इंद्रप्रीत कौर यांची पहिली प्रतिक्रिया आली होती. त्यावेळी त्यांनी ही आपली दोन्ही मुलं सीरत कौर आणि दिलशान हे भगवंत मान यांच्या शपथविधीला उपस्थित राहतील असं सांगितलं होतं. भगवंत मान यांच्या यशासाठी मी देवाकडे कायमच प्रार्थना केली आहे, यापुढेही करत राहीन अशी भावना इंद्रप्रीत कौर यांनी व्यक्त केली होती.
2015 साल हे भगवंत मान यांच्या आयुष्यात कौटुंबिक कलह वाढवणारं ठरलं. पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यापासून फारकत घेतली. कोर्टानं निर्णय दिलाय, मला दोन परिवारांमधून एका परिवाराची निवड करायची होती, मी पंजाबलं निवडलं. अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटस्फोटानंतर दिली होती.
खरंतर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार केला होता. पण काही नात्यांची वीण सैल झाली की हलकासा झटकाही तुमचं नातं तोडण्यास पुरेसा असतो. भगवंत मान आणि इंद्रप्रीत कौर यांच्या नात्यातही तसंच काहीसं झालं असावं. पण रक्ताची नाती तुटता तुटत नाही. गेल्या सात वर्षांपासून साधं फोनवरही न बोललेली मुलं आज भगवंत मान यांच्या शपथविधीला हजर राहिल्यानं भगवंत मान यांच्यासाठी हा दिवस स्पेशल असेल. राजकीय आणि सामाजिक जीवनात आपण आपल्या कुटुंबाला तुटताना पाहिल्याची खंत भगवंत मान यांनी कित्येकवेळा बोलून दाखवली होती. आता माझ्यासाठी पंजाबची जनताच आई, बाप, बहिण भाऊ असल्याचं भगवंत मान बोलायचे.
भगवंत मान यांच्या घटस्फोटित पत्नी इंद्रप्रीत कौर आणि त्यांची दोन्ही मुलांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलंय, ते तिघेही सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. पण भगवंत मान यांच्या आयुष्यातल्या मोठ्या प्रसंगात त्यांचं सोबत असणं भगवंत मान यांच्यासाठी ऊर्जा देणारं ठरेल.
संबंधित बातम्या :
Punjab New Chief Minister: पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Punjab on Covid19 : पंजाब सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)