Punjab New Chief Minister: पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
पंजाबच्या राजकारणात आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
Punjab New Chief Minister Bhagwant Mann: पंजाबच्या राजकारणात आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते.
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले आहेत की, ''भगत सिंग जी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पक्ष लढत आहे. भगवंत मान म्हणाले की, ''चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारेल. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू.''
शपथविधीपूर्वी भगवंत मान यांनी एक ट्विट केले होते. ज्यात ते म्हणाले आहेत की, “सूर्याच्या सोनेरी किरणाने आज नवी पहाट आणली आहे. शहीद भगत सिंग आणि बाबा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकर कलान येथे शपथ घेणार आहे. शहीद भगत सिंगजींच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलानकडे रवाना होत आहे.''
भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लिहिले होते की, “आजचा दिवस पंजाबसाठी मोठा आहे. नव्या आशेच्या या सोनेरी सकाळी, आज संपूर्ण पंजाब एकत्र येईल आणि समृद्ध पंजाब बनवण्याची शपथ घेईल. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी सुद्धा शहीद भगत सिंग यांचे मूळ गाव खटकर कलानकडे रवाना झालो आहे.''
दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली होती. आता फक्त भगवंत मान यांनी घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री असू शकतात, असे मानले जात आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 जागांपैकी आपने 92 जागा जिंकल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान यांनी राज्यातील जनतेला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.