Prophet Muhammad Row : आधी अटक, मग पक्षातून निलंबन अन् आता जामीन; भाजप आमदार टी. राजा यांची जामीनावर सुटका
Prophet Muhammad Row : आमदार टी राजा सिंह (MLA T. Raja) यांनी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि धर्म विशेष यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ जारी केला होता.
Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad Paigambar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह (MLA T Raja Singh) यांना न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना तात्काळ सोडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून टी. राजा यांना सोडून देण्यात आलं. तेलंगणा पोलिसांनी काल (मंगळवारी) टी. राजा यांना अटक केली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षानं त्यांना निलंबित केलं. यासोबतच त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी विचारणा करत पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
दरम्यान, त्याच्या अटकेची मागणी करत हैदराबादमध्ये अनेकांनी धरणं आंदोलन केल्यावर वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर सिंह यांना आधी ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.
टी. राजा यांना अटकेनंतर काही वेळातच स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. जिथे त्यांच्या न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात हजर केल्यानंतर टी. राजा यांच्या वकिलांनी युक्तीवादा दरम्यान, न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की, टी. राजा यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांकडून फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम-41 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली नव्हती. न्यायालयानं राजा सिंह यांच्या वकिलांचा युक्तिवाद स्विकारत जामीन मंजूर केला आणि टी. राजा यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले.
टी. राजा यांच्या वकिलांनी सांगितलं की, "पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन केलं नाही. ज्या अंतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये अटक करण्यापूर्वी नोटीस दिली जाते. टी. राजा यांच्या समर्थक आणि विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानं न्यायालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमलेल्या लोकांना पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली."
टी. राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादमध्ये शो होणार होता. या शोला टी. राजा यांनी विरोध केला. तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मुन्नावर फारुखीला परवानगी दिल्यास त्याच्याकडून वादग्रस्त टिप्पणी होण्याची शक्यता आहे. फारुकी आपल्या कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांबाबत वादग्रस्त टिप्पणी करतात, असंही राजा यांनी म्हटले. मुनव्वर फारुकीचा शो 20 ऑगस्ट रोजी होणार होता. त्याच्या शोला आधी विरोध करताना टी राजा सिंह यांनी यांनी म्हटले होते की 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु. कार्यक्रमाचे तिकीट आमचे कार्यकर्ते विकत घेतली आणि पुढे काय होईल ते तुम्हाला माहित आहे.' असा इशाराही दिला होता.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी राजा यांची ओळख
आमदार टी. राजा हे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जाते. त्यांनी अनेकदा प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचा पुरस्कार केला आहे. टी. राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.