एक्स्प्लोर
अर्थसंकल्प कसा छापला जातो?
अर्थसंकल्प नेमका कसा छापला जातो, त्यासाठी काय गोपनियता पाळली जाते, अर्थसंकल्प संसदेपर्यंत कसा येतो, याचीही एक मोठी आणि गोपनिय प्रक्रिया आहे.

प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेत अर्थमंत्री सादर करतात तो अर्थसंकल्प नेमका कसा छापला जातो, त्यासाठी काय गोपनियता पाळली जाते, अर्थसंकल्प संसदेपर्यंत कसा येतो, याचीही एक मोठी आणि गोपनिय प्रक्रिया आहे. अर्थमंत्रालयाच्या तळघरामध्ये अत्याधुनिक प्रिंटिंग प्रेस आहे. अर्थमंत्रालयाचे जवळपास 100 कर्मचारी 24 जानेवारीपासून प्रिंटिंग प्रेसमध्ये तळ ठोकून असतात. या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही तिथेच केली जाते. एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याच्यासाठी डॉक्टरलाही जागेवर बोलावलं जातं. जास्त आजारी असल्यास त्याला राममनोहर लोहिया रुग्णालयात नेलं जातं, जिथे चोख बंदोबस्त असतो. तिथे कर्मचारी कुटुंबीयांनाही भेटू शकत नाही. 24 जानेवारी रोजी अर्थ मंत्रालयाचे 250 आणि पीआयबीचे जवळपास 100 अधिकारी आणि कर्मचारी प्रिंटिंग प्रेसमध्ये जातात. ज्यानंतर त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. पीआयबीच्या टीममध्ये माहिती अधिकाऱ्यांसोबतच एनआयसीची टीमही सहभागी होते. सर्व जण अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतरच प्रेसमधून बाहेर पडतात. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पास दिला जातो, ज्यामुळे ते कधीही बाहेर जाऊ किंवा येऊ शकतात. सर्वात शेवटी अर्थमंत्र्यांचं भाषण छापलं जातं. अर्थमंत्र्यांना वाटल्यास ते रात्री 10 वाजताही त्यांच्या भाषणात फेरबदल करु शकतात. गुप्तचर यंत्रणेकडून सर्वांना विशेष पास जारी केले जातात, ज्यावर अधिकाऱ्यांना ये-जा करता येते. विशेष क्षेत्रातून बाहेर जाताना पास जमा करणं बंधनकारक असतं. अर्थसंकल्पाच्या आता अडीच हजार प्रती छापल्या जातात, अगोदर ही संख्या आठ हजार होती. अडीच हजारांपैकी जवळपास 800 प्रती खासदारांसाठीच असतात. छपाई आणि पॅकिंग पूर्ण झाल्यानंतर विशेष सुरक्षेत अर्थसंकल्पाचा दस्तावेज संसद भवनात आणला जातो. संसद भवनात हा दस्तावेज तेथील सुरक्षा अधिकारी आपल्या ताब्यात घेतात. अर्थ मंत्रालयात माध्यमांना 1 डिसेंबरपासूनच जाण्यास मनाई असते. विशेष परिस्थितीमध्येच विशेष पास देऊन त्यावर पत्रकारांना अर्थ मंत्रालयात सोडलं जातं.
आणखी वाचा























