(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान मोदी उद्यापासून चार राज्यांचा दौरा करणार, 50000 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 आणि 8 जुलै रोजी चार राज्यांना भेट देणार आहेत. यावेळी ते सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 आणि 8 जुलै रोजी चार राज्यांना भेट देणार आहेत. यावेळी ते सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश राज्याला भेट देणार आहेत. तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगणा आणि राजस्थानला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.
कसा असेल दौरा
7 जुलैला म्हणजे उद्या सकाळी 10:45 च्या सुमाराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होईल. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथं दुपारी 2:30 च्या सुमाराला पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील. त्यानंतर ते गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास, वाराणसी येथे पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.
दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10:45 वाजता, तेलंगणा राज्यातील वरंगल येथे पंतप्रधानांचे आगमन होणार असून ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे दुपारी 4:15 च्या सुमारास बिकानेर येथे आगमन होईल. तिथे ते राजस्थानमधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.
रायपूरमध्ये 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण
पंतप्रधान रायपूरमध्ये सुमारे 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी,पंतप्रधान छत्तीसगडमधील पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. गोरखपूर - लखनौ आणि जोधपूर - अहमदाबाद (साबरमती) यांना जोडणाऱ्या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली जाणार आहे.
वाराणसीमध्ये 12,100 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान वाराणसीमध्ये 12,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. समर्पित मालवाहतुकीसाठीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन - सोन नगर रेल्वेमार्गाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. वाराणसी ते लखनौ सुलभ आणि जलद प्रवासासाठीच्या राष्ट्रीय महामार्ग -56 च्या वाराणसी-जौनपूर चौपदरीकरण क्षेत्राचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत.
बिकानेरमध्ये 24,300 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण
मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्ज, पीएमएवाय ग्रामीण घरांच्या चाव्या आणि आयुष्मान कार्डचे वाटप करणार आहेत. तसेच वरंगलमध्ये सुमारे 6 हजार 100 कोटी रुपयांच्या अनेक रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. बिकानेरमध्ये पंतप्रधान 24,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान अमृतसर - जामनगर आर्थिक कॉरिडॉरचा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे खंड आणि हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी आंतर-राज्य पारेषण वाहिनीचा टप्पा-1 राष्ट्राला समर्पित करतील. बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: