पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान लॉकडाऊन संदर्भात कोणती घोषणा करणार का याची उत्सुकता आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधानांनी कालच (11 मे) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतही दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मोदी लॉकडाऊनसंदर्भात घोषणा करणार याचीही उत्सुकता आहे.
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020
मार्च महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा देशातील जनतेशी संवाद साधला होता. पहिला संवाद हा जनता कर्फ्यूची घोषणा करताना साधला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करताना, मग 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना मोदींनी तिसऱ्यांदा देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर आज (12 मे) रात्री आठ वाजता पंतप्रधान पुन्हा एकदा देशाला उद्देशून भाषण करतील.
लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत पंतप्रधानांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला त्यावेळी लॉकडाऊन 4 कसा असेल याचे संकेत दिले. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, "लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील आवश्यक उपायांची गरज नव्हती. अशाचप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील आवश्यक उपाययोजनांची गरज चौथ्यामध्ये नाही, असं माझं मत आहे." त्यांच्या या वक्तव्यावरुन लॉकडाऊन 4 चे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लॉकडाऊनचे तीन टप्पे पहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे
Lockdown 4| 18 मे पासून चौथा लॉकडाऊन सुरु होणार? 15 मेपर्यंत आराखडा देण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना