(Source: ECI/ABP News/ABP Majha)
23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अवकाश दिन' म्हणून साजरा करणार भारत; बंगळुरूत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM Modi Visit Bangalore Meet ISRO Scientist: चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.
PM Modi Visit Bangalore Meet ISRO Scientist Team: चांद्रयान-3 मोहिमेत (Chandrayaan-3) सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगळुरूमधील (Bengaluru) इस्रोच्या (ISRO) कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. तसेच, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली. आजपासून दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी बोलताना म्हणाले की, "तुम्ही केलेल्या कामाची माहिती देशवासियांना मिळाली पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचं सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडर उतरवून त्याची चाचणी घेण्यात आली. इतक्या परीक्षा देऊन मून लँडर तिथे सुखरुप पोहोचलं, त्यामुळे त्याला यश मिळणार हे निश्चित होतं. आज जेव्हा मी पाहतो की, भारतातील तरुण पिढी सायन्स, स्पेस आणि इनोवेशन या संदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, त्यामागे हेच यश आहे."
मंगळयान आणि चांद्रयानचं यश आणि गगनयानच्या तयारीनं देशाला एक नवं चैतन्य दिलं आहे. आज भारतातील थोरामोठ्यांच्या तोंडी चांद्रयानाचं नाव आहे. आज भारतातील लहान मूलही आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे. संपूर्ण भारताच्या पिढीला तुम्ही जागृत करून ऊर्जा दिली, हेही तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही तुमच्या यशाची खोल छाप सोडली आहे. आजपासून रात्रीच्या वेळी चंद्र पाहणाऱ्या कोणत्याही लहान मुलाला विश्वास बसेल की, माझा देश जसा चंद्रावर पोहोचला आहे, तेवढीच हिंमत आणि चैतन्य त्या मुलामध्येही आहे. मुलांमध्ये स्वप्नांची बीजं तुम्ही पेरली आहेत. ती वटवृक्ष बनतील आणि विकसित भारताचा पाया बनतील. तरुण पिढीला सतत प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 23 ऑगस्ट रोजी भारतानं चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत 'राष्ट्रीय अवकाश दिवस' म्हणून साजरा करेल. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.
23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन
भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.