Drone Mahotsav 2022 : यापूर्वी लोकांना तंत्रज्ञानाची भीती दाखवली जात होती, पण आज लोकांपर्यंत आम्ही पोहचवले : PM मोदी
Drone Mahotsav 2022 : पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी तंत्रज्ञानाची भीती दाखवली जात होती, पण ते लोकांपर्यंत नेण्याचे काम आम्ही केले.
Drone Mahotsav 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन केले. पीएम मोदींनी ड्रोन प्रदर्शन पाहिले. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, या तंत्रज्ञानाबाबत जो उत्साह आज दिसत आहे तो खूपच आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी तंत्रज्ञानाची भीती दाखवली जात होती, पण ते लोकांपर्यंत नेण्याचे काम आम्ही केले.
भारत तंत्रज्ञानात वेगाने पुढे जात आहे - पंतप्रधान
PM मोदी ड्रोन महोत्सवाला संबोधित करताना म्हणाले की, आज भारत एक स्टार्टअप शक्ती म्हणून ड्रोन तंत्रज्ञानात वेगाने पुढे जात आहे. हा सण केवळ तंत्रज्ञानाचाच नाही, तर नवीन भारताच्या नवीन प्रयोगांचा, अभूतपूर्व सकारात्मकतेचा उत्सव आहे. 8 वर्षांपूर्वीचा हा काळ होता जेव्हा आम्ही भारतात सुशासनाचे नवीन मंत्र लागू करण्यास सुरुवात केली होती. आम्ही Ease and Living आणि Ease of Doing Business ला प्राधान्य दिले. 'सबका साथ सबका विकास' या मंत्राला अनुसरून आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारशी जोडण्याचा मार्ग निवडला..
'तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांची भीती संपली'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात तंत्रज्ञान हा एक समस्येचा भाग मानला जात होता, तंत्रज्ञान हे गरीबांसाठी नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे 2014 पूर्वीच्या कारभारात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते. सर्वात जास्त नुकसान देशातील गरिबांचे, वंचितांचे, मध्यमवर्गाचे झाले. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळात धान्य, रॉकेल, साखरेसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. लोकांना त्यांच्या वाट्याचा माल मिळेल की नाही, अशी भीती वाटत होती. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ही भीती दूर केली आहे.