केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मुंबईतील वांद्रे परिसरातील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राणे कुटुंबातील काही सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत.
70 वर्षीय नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडे गेले होते. यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करुन, एक स्टेन टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टर कलारिकल मॅथ्यू यांनी राणेंवर अँजिओप्लास्टी केली.
नारायण राणे यांना आणखी तीन चे चार दिवस रुग्णालयात ठेवलं जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. नारायण राणे त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही त्रास नाही. मात्र डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
राणेंवर याआधीही अँजिओप्लास्टी
भाजप नेते नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही पहिल वेळ नाही. 2009 मध्येही त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. राणेंच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर ही प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी राणेंना वांद्रे इथल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
भाजप नेते नितेश राणेंनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की, "नारायण राणे यांच्या रुटीन चेकअपसाठी त्यांना या ठिकाणी आणलं होतं. खूप दिवसापासून राहिलेल्या काही टेस्ट करायच्या बाकी होत्या. आज आणि उद्या काही टेस्ट केल्या जातील आणि रविवार पर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. 2009 साली नारायण राणेंची अँजिओप्लास्टी झाली आहे. सगळं काही रूटीनमध्ये आहे का हे आपल्याला तपासावं लागतं. त्याच रुटिन चेकअपसाठी आम्ही आज एडमिट केलं आहे."
इतर संबंधित बातम्या
उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाशी गद्दारी करून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली ; नारायण राणेंची टीका