PM Kisan : नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार
PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता येत्या 1 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या वतीनं देशातील शेतकऱ्यांना गिफ्ट मिळाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला देण्यात येणार आहे. 1 जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील.
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल,
1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
महत्त्वाच्या बातम्या :