Parliament Special Session : ईडी, सीबीआय ते वॉशिंग मशीन; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा
Parliament Special Session: संसदेच्या विशेष सत्रामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला (Special Session) (18 सप्टेंबर) रोजी सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी जुन्या संसद भवनात भाषण देखील केले. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी यावेळी बोलतांना म्हटलं की, 'सरकार मजबूत आणि विरोधी पक्ष कमकुवत बनवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जातो.'
पुढे बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, 'जर कोणत्या नेत्या भाजपमध्ये सामील करुन घेणार असतील तर त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकून आधी स्वच्छ केलं जात.' तसेच खरगेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात करत म्हटलं की, 'पंतप्रधान मोदी संसदेत कधीतरी येतात आणि त्यांच्या येण्याचा देखील कार्यक्रम केला जातो.'
पंतप्रधान मणिपूरमध्ये का नाही जात? - खरगे
मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मणिपूरच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. 'मणिपूरमध्ये हिंसा अजूनही सुरुच आहे. 3 मे पासून मणिपूरमध्ये हिंसेचं सत्र सुरुच आहे. तिथे लोकांचा जीव जातोय, घरं जाळली जातायत. आज देखील एकाने आपला जीव गमावला. याविषयी चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधान मोदींनी देखील यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. पंतप्रधान मोदी देशातील प्रत्येक भागात जातात.' मग ते आता मणिपूरमध्ये का जात नाही असा सवाल देखील खरगेंनी यावेळी संसदेत उपस्थित केला.
'नऊ वर्षात फक्त दोनदाच पंतप्रधान मोदींनी दिलं निवेदन'
'तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात 21 वेळा निवेदन दिलं. तर मनमोहन सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 30 वेळा निवदेन दिलं. पण पंतप्रधान मोदी यांचे प्रचलित विधान बाजूला ठेवले तर त्यांनी नऊ वर्षांच्या कलावधीमध्ये फक्त दोनदाच निवेदन दिलं आहे', असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेला सांगितलं.
LIVE: LoP Rajya Sabha Shri @kharge speaks in Parliament. https://t.co/2ZvQsHcwkR
— Congress (@INCIndia) September 18, 2023
'संविधानाने मतदानाचा अधिकार दिला'
संविधान निर्मात्यांनी आपल्याला जे संविधान दिलं, त्यामुळे आपल्याला एकजूटीने राहण्याचा संदेश दिला आहे. भारतीय संविधान आपल्यासाठी खूप मोठा मार्गदर्शक आहे. त्याच्याचमुळे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. यामुळे गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला. पण हेच संविधान बदलण्याचा प्रयत्न आता केला जात आहे, जे अत्यंत गंभीर असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे.