भारतात 33 लाखांहून अधिक बालकं कुपोषित; त्यापैकी 17.7 लाख तीव्र कुपोषित, RTI मधून भेदक वास्तव समोर
भारतात 33 लाखांहून अधिक बालकं कुपोषित; त्यापैकी 17.7 लाख तीव्र कुपोषित असल्याचं माहितीच्या अधिकाराखाली (RTI) समोर आलं आहे.
नवी दिल्ली : महिला आणि बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, देशात 33 लाखांहून अधिक बालकं कुपोषित आहेत आणि यापैकी निम्म्याहून अधिक बालकं तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीत येतात. कुपोषणाचा आकडा अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात ही राज्य सर्वात वरच्या स्थानी आहेत.
कोविड महामारीमुळे गरिबातील गरीब लोकांचे आरोग्य आणि पोषण संकट आणखी तीव्र होण्याची भीती महिला आणि बालविकास मंत्रालयाने व्यक्त केली आहे. तसेच, 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत देशात 17,76,902 बालकं तीव्र कुपोषित आणि 15,46,420 बालकं अल्प कुपोषित आहेत.
33 लाख बालकं कुपोषित : महिला आणि बाल विकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एका आरटीआय अर्जाला उत्तर देताना म्हटलं की, 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आकड्यांवरुन एकूण 33,23,322 बालकांचा आकडा समोर आला आहे. पोषण परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या वर्षी विकसित केलेल्या 'पोषण' अॅपवर या डाटाची नोंदणी करण्यात आली होती.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानुसार, "अंगणवाडी व्यवस्थेमध्ये 8.19 कोटी बालकांमध्ये केवळ 33 लाख कुपोषित आहेत. ज्यांचं सरासरी प्रमाण एकूण बालकांच्या केवळ 4.04 टक्के आहे."
कुपोषित बालकांच्या संख्येत 91 टक्के वाढ
माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आलेली आकडेवारी खरोखरच अत्यंत धक्कादायक आहे. परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेत हे आकडे अधिक चिंता वाढवतात. नोव्हेंबर 2020 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत 91 टक्के वाढ झाली आहे.
तथापि, या संदर्भात दोन प्रकारची आकडेवारी आहे. जी डेटा संकलनाच्या वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहे. गेल्या वर्षी, गंभीर कुपोषित बालकांची संख्या (सहा महिन्यांपासून ते सहा वर्षांपर्यंत) 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे मोजण्यात आली आणि केंद्राला अहवाल दिला. ताज्या आकडेवारी पोषण ट्रॅकर अॅपवरून घेतली आहे. जिथे डेटा थेट अंगणवाड्यांद्वारे नोंदवला जातो आणि केंद्राकडून प्राप्त होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :