भाजप म्हणजे हिंदू समाज नाही; संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशींचं वक्तव्य
भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भाजपला विरोध करणे म्हणजे हिंदूंना विरोध करणे नाही, असं विधान संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशी यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भाजपला विरोध करणं, म्हणजे हिंदूंना विरोध करणं नाही, असं वक्तव्य संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे, त्याला हिंदूंशी जोडू नका, असंही भैय्याजी जोशी बोलताना म्हणाले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस सुरेश 'भैयाजी जोशी' यांनी रविवारी भाजप आणि हिंदुत्वाबाबत एक मोठ वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, 'भाजपला विरोध करणं म्हणजे, हिंदूंना विरोध करणं नाही. गोव्यातील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी बोलत होते. त्यावेळी हिंदू आपल्याच समुदायाचे दुश्मन बनत आहेत, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 'भाजपला करण्यात येणारा विरोध म्हणजे, हिंदूंचा विरोध नाही. ही एक राजकीय लढाई आहे जी सुरूच राहणार आहे. याला हिंदूशी जोडणं अत्यंत चुकीचं आहे.'
गोव्यामधील दोनापावला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने 'विश्वगुरू भारत-आरएसएसचा दृष्टीकोन' या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भय्याजी जोशी म्हणाले की, 'तुम्ही उच्चारलेला प्रश्न असा आहे की, हिंदूच हिंदूंचे शत्रू बनले आहेत, म्हणजे भाजप. हिंदू समाजाचा अर्थ भाजप नाही.' नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) वरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भय्याजी जोशींचं हे वक्तव्य फार महत्त्वाचं ठरलं आहे. भय्याजी जोशी पुढे बोलताना म्हणाले की, 'एक हिंदू आपल्याच लोकांसोबत लढतो कारण ते आपला धर्म विसरतात. एवढचं नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्या परिवाराच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. जिथे भ्रम आणि आत्मकेंद्रित व्यवहार होत असतो, तिथे विरोध असतोच.'
संबंधित बातम्या :
'इंटरनेटचा वापर मूलभूत अधिकार आहे', हा गैरसमज : रविशंकर प्रसाद
फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल : एकनाथ खडसे
जुन्या विचाराने गेलो असतो तर राम मंदिर, करतारपुर प्रश्न सुटले नसते; मोदींची काँग्रेसवर टीका