एक्स्प्लोर
भारत-पाक सीमेवर दहशतवाद्यांची घुसखोरी आणि कारवाया रोखण्यासाठी 'ऑपरेशन सुदर्शन'
भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सूक्ष्म निरीक्षण ठेवणे, आपल्या क्षेत्रात आपलं प्रभुत्व दाखवणे आणि दहशतवाद विरोधी कारवायांवर लक्ष ठेवून कारवाई करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी जम्मूमध्ये भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) वतीने एका नव्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. 'ऑपरेशन सुदर्शन' असं या मोहिमेचं नाव आहे. जम्मूमध्ये सध्या अमरनाथ यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे 'ऑपरेशन सुदर्शन' अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशनच्या धर्तीवर मोहीम राबवली जात आहे.
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) 1 जुलैपासूनच ही मोहीम हातात घेतली असून त्यावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. या ऑपरेशनचे नाव भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सूक्ष्म निरीक्षण ठेवणे, आपल्या क्षेत्रात आपलं प्रभुत्व दाखवणे आणि दहशतवाद विरोधी कारवायांवर लक्ष ठेवून कारवाई करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
या मोहिमेचा दुसरा महत्वाचा उद्देश पाकिस्तानकडून घुसखोरीसाठी तयार केलेले भुयारं शोधण्याचा आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत मागील काही दिवसात कित्येक भुयारांचा शोध भारतीय जवानांनी लावला आहे.
या भागात गवत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सरकंडा नावाचे हे गवत पावसाळ्यात वाढते आणि ते 7 फुटांपर्यंत वाढते. त्यामुळे आसपासच्या भागावर नजर ठेवणे अवघड जाते. त्याच्या आडून दहशतवादी भारतात प्रवेश करतात. अशा प्रकारचे गवत आणि वृक्ष हटविण्याची कामगिरी या मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आली आहे.
पाकिस्तानसोबतची सीमा भक्कम करण्यासाठी सरकारला अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. भारत-पाक सीमेलगत कुंपण आणि मोठे प्रकाशझोत उभारायचे काम म्हणूनच हाती घेण्यात आले आहे. ऑपरेशन सुदर्शन हा त्याचाच पुढचा भाग आहे.
सध्या अमरनाथ यात्रा सुद्धा सुरू असून ही यात्रा ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या निमित्तानेही सरहद्दीवर कठोर पाळत ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ‘घुसखोरी विरोधी ग्रिड’ नावाची ही व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी आघाडीवरील भागांमध्ये हजारो अधिकारी आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement