History : मेक्सिको गुलामगिरीतून मुक्त आणि ब्रिटनमध्ये महामंदी, 16 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार
16 September In History : 16 सप्टेंबर या दिवशी मेक्सिकोने स्पेनची गुलामगिरी झटकून दिली आणि स्वत:ला स्वातंत्र्य जाहीर केलं.
मुंबई: सप्टेंबर महिना हा भारताच्या तसेच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातही 16 सप्टेंबर रोजी जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. आजच्याच दिवशी मेक्सिकोने स्वत:ला स्पेनच्या गुलामीतून मुक्त झाल्याचं जाहीर केलं. तर भारत आणि भूटानच्या मैत्री संबंधासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भारत विरोधी कोणत्याही कृत्यासाठी आपली भूमी वापरू देणार नाही असं आश्वासन भूटानने दिलं होतं.
जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं,
1810- मेक्सिकोने स्वातंत्र्य असल्याचं जाहीर केलं
आजच्याच दिवशी, 1810 साली मेक्सिकोने आपण स्पेनच्या गुलामीतून स्वातंत्र्य होत असल्याचं जाहीर केलं. स्पेनने तब्बत 300 वर्षे मेक्सिकोवर राज्य केलं.
1920- अमेरिकेच्या वॉल स्ट्रिटवर बॉम्ब स्फोट, 38 जणांचा मृत्यू
अमेरिकेतील वॉल स्ट्रिटवर काही कट्टरवाद्यांनी आजच्याच दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 38 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा स्फोट नेमका कोणी केली याची उकल शेवटपर्यंत झाली नसली तरी काही कट्टरवादी संघटनांचा यामध्ये हात असल्याचं सांगण्यात येत होतं.
1931- ब्रिटनमध्ये महामंदी
जागतिक महामंदीचा मोठा फटका ब्रिटनला बसला होता. 1931 साली ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये 600 दशलक्ष डॉलरची आर्थिक तूट आली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये महामंदी आली.
1978- इराणमध्ये भूकंप, 20 हजार लोकांचा मृत्यू
इराणमध्ये 16 सप्टेंबर 1978 साली भीषण भूकंप झाला. त्यामध्ये तब्बल 20 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
1978- पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी जनरल जिया उल हक यांची निवड
पाकिस्तानचे चौथे लष्करशाह आणि सहावे राष्ट्रपती अशी ओळख जनरल जिया उल हक यांची आहे. 1978 साली त्यांची पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. 1977 ते 1988 पर्यंत ते सत्तेवर होते. 1988 साली एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
2003- भूटानचे भारताला आश्वासन
भारत विरोधात कोणत्याही कृत्यासाठी भूटानच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही असं आश्वासन भूटानने भारताला दिलं. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भूटानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.