(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Train Accident : मृतदेह ठेवलेल्या शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांचा नकार, भीतीचं वातावरण; सरकारला इमारत पाडण्याचं आवाहन
Balasore Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील मृतदेह शाळांमध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. या इमारती पाडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Odisha Train Accident : ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले होते. या दुर्दैवी ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा एवढा होता की, मृतदेह ठेवण्यासाठी शवगृहांमध्येही जागा शिल्लक नव्हती. यामुळे अपघातग्रस्तांचे मृतदेह इतर ठिकाणी ठेवण्यात आले. यावेळी बालासोर येथील एका शाळेमध्ये ही मृतदेह ठेवण्यात आले होते. आता अपघातानंतर येथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, मृतदेह ठेवलेल्या शाळांमध्ये जाण्यास तयार नाहीत.
शाळेत मृतदेह ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती
मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे अपघातातील मृतदेह बालासोर येथील एका 65 वर्ष जुन्या शाळेच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, शाळेमध्ये मृतदेह ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. तर, काही विद्यार्थ्यांनी शाळेची इमारत पाडण्याची मागणी केली आहे. यासोबत जुनी शाळेची इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत उभारण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे.
शाळेत धार्मिक विधी करण्याचं नियोजन
ओडिशातील बहनगा हायस्कूलमध्ये मृतदेह ठेवण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या वर्गात परतण्यास घाबरत आहेत. विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळेची जुनी इमारत पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे. बहनगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन यांनी सांगितलं की, "विद्यार्थी घाबरले आहेत. शाळेने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची आणि काही विधी करण्याची योजना आखली आहे."
शाळेचं नुतनीकरण करण्याची मागणी
त्यांनी सांगितलं की, शाळेतील काही ज्येष्ठ विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट देखील बचावकार्यात सामील झाले होते. शाळा आणि जनशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार बालासोरचे जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी 8 जून रोजी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, ''मी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापिका, इतर कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. त्यांना जुनी इमारत पाडून तिचं नूतनीकरण करायचं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात जाताना कोणतीही भीती वाटणार नाही.''
विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) च्या एका सदस्याने जिल्हा दंडाधिकार्यांना दिलेल्या माहितीनुसार की, ''शाळेच्या इमारतीत पडलेले मृतदेह टीव्हीवर पाहिल्यानंतर, विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. 16 जून रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहे. पण, विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत.'' दरम्यान, शाळेतील मृतदेह आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले असून परिसरात निर्जंतुकीकरण केलं आहे. पण, विद्यार्थी आणि पालक घाबरलेले आहेत. एका विद्यार्थ्याने सांगितले, “आमच्या शाळेच्या इमारतीत इतके मृतदेह ठेवण्यात आले होते हे विसरणं कठीण आहे.” शाळा व्यवस्थापन समितीने सुरुवातीला फक्त तीन वर्गखोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी शाळेच्या सभागृहाचा वापर केला.