(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Odisha Lightning Death: ओदिशामध्ये आस्मानी संकट! आतापर्यंत 61000 वेळा पडली वीज, 12 लोकांचा मृत्यू
Odisha Lightning Death: आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राज्यात 61 हजारांहून अधिक वेळा वीज कोसळली आहे.
ओडिशा : ओदिशात (Odisha) वीज पडल्याने लोकांवर मृत्यूचं संकट ओढावलं आहे. राज्यात शनिवारी (02 सप्टेंबर) रोजी सायंकाळी फक्त दोन तासांत 61 हजार वीज कोसळल्या. यामध्ये 12 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर आतापर्यंत 14 जणं गंभीर जखमी झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर जिल्ह्यामध्ये वीज पडण्याच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. तसेच, राज्यात 7 सप्टेंबरपर्यंत वातावरण चांगले राहणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन प्रशसानाकडून करण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी यलो अलर्ट देखील जारी केला गेलाय. बंगालच्या उपसागरात चक्रिवादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे ओदिशा राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली.
तर वीज कोसळण्याच्या अनेक घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या शक्यतेबाबत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय चक्रीवादळामुळे ओदिशामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. ओदिशा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत राज्यात 61 हजारांहून अधिक वेळा वीज कोसळली.
मृतांच्या कुटुंबियांना देणार मदत
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वात जास्त संख्या ही भुवनेश्वर जिल्ह्यात आहे. यामध्ये खुर्दा जिल्ह्यात चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौध, गजपती, जगतसिंगपूर, पुरी, ढेंकनाल येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. याशिवाय गजपती आणि कंधमाल जिल्ह्यातही वीज पडून आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान यामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे. या कुटुंबियांना चार लाख रुपयांची विशेष मदत मिळणार असल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रदीर्घ कालावधीनंतर मान्सून परतला आहे. त्यामुळे अशा वीज पडण्याच्या घटना घडत आहे. तसेच जेव्हा थंड आणि उष्ण हवा एकत्र होते तेव्हा वीज पडण्याची घटना घडते असं देखील हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. तर नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.