कोरोना रुग्णसंख्या कमी होईल का? तज्ज्ञ म्हणतात, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी होण्याची शक्यता
संसर्गाच्या मागील दोन लाटीप्रमाणे देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Covid Cases in India: मागील चार दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्यात वाढ होत आहे. दररोज अडीच लाखांच्या पुढेच कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी रुग्णसंख्येत घटही होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोरोना रुग्णसंख्या कमी कमी होत जाईल का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोनाची उच्चांकी लाट अद्याप आलेली नाही. संसर्गाच्या मागील दोन लाटीप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एम्समधील कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. पुनीत मिश्रा यांच्या मते, काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण कोरोनाची लाट आली आहे. मात्र, ती संपायला सुरूवात झाली असे म्हणता येणार नाही. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एम्समधील कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. हर्षल साळवे यांचेही असेच काहीसे म्हणणे आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी कोरोनाच्या उच्चांकी रुग्णसंख्येची मोंद होईल, असाही त्यांचा दावा आहे. संपूर्ण भारताबद्दल बोलायचे झाले तर, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत भारतात कोरोनाची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. पुढच्या एत ते दोन आठवड्या दिल्ली आणि मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल असेही डॉ. हर्षल साळवे यांनी सांगितले. काही काळानंतर ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एम्समधील इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन आणि कम्युनिटी मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. संजय राय यांच्या मते, कोरोना रुग्णसंख्या थांबवणे शक्य नाही. जगातील कोणताही देश कोरोनाला रोखू शकत नाही. कोणतीही कृती, मग ती लॉकडाउन असो किंवा नाईट कर्फ्यू असो. कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी असू शकतो, पण थांबवता येत नाही असे ते म्हणाले.
प्रत्येक देशात संसर्ग दर भिन्न आहे. कारण तो आपल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो. सुरूवातीला दिल्ली, मुंबईत, संसर्ग खूप जास्त होता. सध्या जरी ग्रामीण भागात संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी फेब्रुवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांची उच्चांकी संख्या नोंद होण्याची शक्यता आहे. गेल्या 20 दिवसांपासून दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासह, पॉझिटीव्हीटी रेटमध्ये देखील वाढ होत आहे.
14 जानेवारीला देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर पॉझिटीव्हीटी रेट हा 14.78% नोंदवला गेला होता. 15 जानेवारीला 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि पॉझिटीव्हीटी रेट हा 16.66 टक्के होता. तर 16 जानेवारीला 2 लाख 71 हजार 202 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. पॉझिटीव्हीटी रेट हा 16.28% नोंदविला गेला. तर 17 जानेवारीला कोरोनाची रुग्णसंख्या थोडी घटल्याचे पाहायला मिळाले. 17 जानेवारीला 2 लाख 58 हजार 89 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि पॉझिटीव्हीटी रेट हा 19.65 टक्के नोंदवला गेला होता. म्हणजे सातत्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच पॉझिटीव्हीटी रेटमध्येसुद्धा वाढ होत आहे.
1 जानेवारी - रुग्णसंख्या 22,775 - पॉझिटीव्हीटी रेट 2.05 टक्के .
5 जानेवारी - रुग्णसंख्या 58 हजार 097 - पॉझिटीव्हीटी रेट 5.03 टक्के
10 जानेवारी रुग्णसंख्या 1 लाख 79,723 - पॉझिटीव्हीटी रेट 13.29 टक्के
15 जानेवारी रुग्णसंख्या 2 लाख 68 हजार 833 पॉझिटीव्हीटी रेट 16.66 टक्के .