Ajit Doval News: नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत धार्मिक, ते असते तर भारताची फाळणी कधीच झाली नसती: अजित डोवाल
NSA Ajit Doval On Netaji Subhas Chandra Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस हे धार्मिक होते तसेच गांधीजींना आव्हान देणारे एकमेव नेते असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले.
नवी दिल्ली: भारताचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्या हाती असतं तर भारताची फाळणी कधीच झाली नसती असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval) म्हणाले. पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जिना यांनीही सुभाषचंद्र बोस या एकमेव व्यक्तीलाच आपण नेता म्हणून स्वीकारू शकतो असं वक्तव्य केल्याचंही अजित डोवाल यांनी सांगितलं. नवी दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल लेक्चर या कार्यक्रमात अजित डोवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व होतं, ते एकमेव नेते होते ज्यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याची क्षमता होती, तसेच त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांसमोर कधीही भीक मागितली नसल्याचं अजित डोवाल म्हणाले.
अजित डोवाल म्हणाले की, "सुभाषचंद्र बोस यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या इतिहासाचे पुनर्लेखनाला पाठिंबा दिल्याने आपण आनंदी आहोत. 1962 साली आपल्या देशाची युद्धाची कोणतीही तयारी नव्हती, त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला."
#ASSOCHAM’s #NetajiSubhasChandraBose Memorial Lecture began on the beautiful note of a 🌼floral tribute🌼 to #Netaji by Chief Guest Shri Ajit Doval, KC,
— ASSOCHAM (@ASSOCHAM4India) June 17, 2023
National Security Advisor, Prime Minister's Office, Shri Ajay Singh, President ASSOCHAM & Chairman and Managing Director,… pic.twitter.com/FbBS57qtRA
जपानने नेताजींना पाठिंबा दिला
अजित डोवाल म्हणाले की, "नेताजी एकटे होते, त्यांना पाठिंबा देणारा जपानशिवाय दुसरा देश नव्हता. नेताजी म्हणाले होते की, मी पूर्ण स्वातंत्र्यापेक्षा कमी कशावरही तोडगा काढणार नाही. त्यांना या देशाला केवळ राजकीय गुलामीतून मुक्त करायचे नव्हते, तर लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलायची होती. नागरिकांना मुक्त जीवन जगता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते."
नेताजी असते तर भारताची फाळणी झाली नसती
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की, "नेताजींच्या मनात विचार आला की मी इंग्रजांशी लढेन, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही. हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. सुभाषचंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. पाकिस्तानचे निर्माते जिना एकदा म्हणाले होते की ते केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाच नेता म्हणून स्वीकारू शकतील.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, "नेताजींच्या महान प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. महात्मा गांधीही त्यांचे प्रशंसक होते. परंतु लोक अनेकदा तुमच्या अंतिम परिमामावरून तुमचा न्याय करतात. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचे संपूर्ण प्रयत्न व्यर्थ गेले असं काही लोकांची मानसिकता आहे. इतिहास नेताजींबद्दल निर्दयी राहिला आहे. आता मला खूप आनंद आहे की पंतप्रधान मोदी त्याचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहेत."
ही बातमी वाचा: