(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wrestlers Protest : बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आरोपपत्र सादर; पुराव्यांमध्ये फोटो, व्हिडीओंचा समावेश
Wrestlers Protest: दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. तर आरोपपत्रात देखील दिल्ली पोलिसांनी अनेक पुरावे कोर्टात सादर केले आहेत.
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या आरोपपत्रामध्ये महिला कुस्तीपटूंवर (Wrestler) केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमधील किमान चार प्रकरणांमध्ये फोटोंचे पुरावे आणि तीन प्रकरणांमध्ये व्हिडीओ पुरावे देण्यात आले आहेत.
गुरुवारी (15 जून) रोजी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 1500 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकणी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी 22 जून रोजी न्यायालयात सुनावणी देखील होणार आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत एक वेगळे आरोपपत्र देखील दाखल केले होते. ज्यामध्ये बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील आरोप रद्द करण्यासंबंधी याचिका करण्यात आली होती. कारण ज्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने बृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार केली होती तिने न्यायदंडाधिकार्यांसमोर आपली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो सादर
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपपत्रात प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारींमध्ये अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. तसेच प्रत्येक आरोपासाठी साक्षीदार, फोटो किंवा व्हिडीओ असल्याचा दावा देखील कुस्तीपटूंनी केला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावे म्हणून सादर करण्यात आलेले हे फोटो पारितोषिक वितरण समारंभ, ग्रुप फोटो आणि इतर कार्यक्रमांमधले आहेत. कुस्तीपटूंनी सादर केलेले काही फोटो हे दुसरीकडून मिळवण्यात आले आहे.
सर्व साक्षीदारांच्या जबाबाचा आरोपपत्रात समावेश नाही
याआधी पाटीआयने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले होते की, पोलिसांनी चौकशी दरम्यान 200 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. परंतु या आरोपांचं समर्थन करत आहेत अशा लोकांच्याच जबाबाचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये सहा कुस्तीपटूंची साक्ष, 70 ते 80 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर पुरावे म्हणून फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्ड्सची माहिती देखील पुरवण्यात आली आहे. तक्रारींचा दावा करण्यासाठी पोलिसांनी फोटो आणि व्हिडीओ पुरावे सादर केल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, आरोपपत्रात प्रत्यक्षदर्शी रेफ्री आणि स्पर्धेतील इतर कर्मचारी यांच्या जबाबांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा