Noida Twin Towers Demolished : अखेर 'ट्विन टॉवर' मातीमोल, परिसरातील लोकांना घ्यावी लागणार 'ही' काळजी
Noida Twin Towers Demolished : अखेर देशातील सर्वात उंच इमारत 'ट्विन टॉवर' जमीनदोस्त झालं आहे. ट्विन टॉवरच्या पाडकामानंतर आता परिसरातील नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Noida Twin Towers Demolished : अखेर नोएडातील भव्य इमारत 'सुपरटेक ट्विन टॉवर' (Supertech Twin Towers) जमीनदोस्त झालं आहे. ट्विन टॉवर्स पाहता-पाहता मातीमोल झाले आहेत. नऊ वर्षांची मेहनत आणि कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेले हे टॉवर्स जमीनदोस्त झाले आहेत. अवघ्या 12 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. यानंतर परिसरात धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं. आता ट्विन टॉवरचा फक्त ढिगारा उरला आहे. सर्वत्र धुळच धूळ पसरली आहे. त्यामुळे ट्विन टॉवर पाडकामानंतर आता परिसरातील नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
धूळ रोखण्यासाठी अँटी स्मोक मशीनचा वापर
सुपरटेक ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर धुळीचे लोट पाहायला मिळाले. धुळीचे कण आसपासच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धुळ रोखण्यासाठी परिसरात अँटी स्मोक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. या अँटी स्मोक मशीन्स हवेतील धुळीचे कण ओढून घेऊन ते जमिनीवर पसरवतात. या अँटी स्मोक मशीनमध्ये पाणी आणि काही केमिकल्सचा वापर करुन वेगवान हवेच्या दाबाने हवेतील धूळ शोषून घेतली जाते आणि ती जमिनीवर बसवली जाते.
परिसरातील नागरिकांना होईल 'हा' त्रास
- डोळे, नाक आणि चेहऱ्यावर जळजळ होणे
- अंगदुखी आणि छातीत गच्च होणे.
- हृदयाचा अनियमित ठोका
- श्वास घेण्यात अडचण
- खोकला येणे आणि नाक वाहणे
- नाकात बंद होणे
- मळमळ आणि पोटदुखी
नागरिकांनी घ्यावी 'ही' काळजी
- मास्क वापरा.
- शक्यतो घराबाहेर पडणं टाळा.
- घराच्या खिडक्या, दरवाजे, चिमण्या, एसी फिल्टर, एकझॉस्ट फॅन हे सर्व करा. यामुळे बाहेरील धूळ घरात शिरणार नाही.
- पाणी पितं राहा. म्हणजे शरीरातील दुषित घटक शरीराबाहेर पडतील.
- लिक्विडचं अधिक सेवन करा.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
नोएडामधील ट्विट टॉवर्स स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त केला. त्यामुळे आता परिसरात धूळ पसरली आहे. इमारत तयार करताना वापरले जाणारे विविध केमिकल्स स्फोटासह हवेत पसरले आहेत. धूळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. तर आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
गेल्या वर्षीच पाडण्यात येणार होता हा 'ट्विन टॉवर'
सर्वोच्च न्यायालयानं 31 ऑगस्ट 2021 रोजी ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यासाठी कोर्टानं 3 महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्यानंतर तसे होऊ शकले नाही. त्यानंतर त्याची तारीख 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली. पण टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली नाही, त्यामुळे टॉवर पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी टॉवर पाडणाऱ्या कंपनीला आणखी 3 महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर 21 ऑगस्ट 2022 रोजी तो पाडायचा होता. मात्र त्यानंतर टॉवर पाडणाऱ्या एडफिस इंजिनिअरिंग कंपनीला एनओसी मिळाली नाही. त्यामुळे आणखी एक आठवडा मुदत वाढवून देण्यात आली. आता 28 ऑगस्टला टॉवर पाडण्यात येणार आहे.