40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृत्यूचं प्रमाणही जास्त
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांत कोरोना व्हायरस आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंबंधी अभ्यास करण्यात आला. त्यात केवळ 10 टक्के सुपरस्प्रेडर्समुळे 60 टक्के नव्या रूग्णांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभ्यास करून संशोधकांच्या एका टीमने कोरोनासंबंधी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे. त्यातून असं दिसून आले आहे की, 40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाची सर्वात जास्त लागण झाली आहे आणि मृत्यूचेही प्रमाण याच वयोगटात सर्वाधिक आहे.
एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांपैकी 10 टक्के कोरोना रूग्णांनी सुपरस्प्रेडर्स म्हणून काम केले आहे. त्यांच्यामुळे जवळपास 60 टक्के नविन रूग्णांची तयार भर पडली आहे. तर 70 टक्के कोरोनाग्रस्त रूग्णांनी कोणताही प्रसार केला नसल्याचे हा अभ्यास सांगतो. 'सुपरस्प्रेडर्स' म्हणजे असे अल्पसंख्य रूग्ण ज्यांनी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार केला आहे. हा अहवाल बुधवारी 'सायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
वॉशिग्टनस्थित सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिसीचे संचालक रामाणन लक्ष्मीनारायण यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून ते 1 ऑगस्ट या काळादरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या दोन राज्यांतील 4,35,000 कोरोना रूग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन दशलक्षाहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला. असे असले तरी देशातील इतर भागाप्रमाणे या दोन राज्यांतही कोरोनासमंबंधी आणि त्यांच्या संपर्कातील लोकांसंबंधीची उपलब्ध माहिती अपुरी असल्याचे संशोधकांनी सांगितले.
संशोधकांनी 84,965 कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 5,75,071 लोकांची माहिती आणि त्यांच्या लॅबोरेटरी रिझल्टचा अभ्यास केला आणि त्यावरून वेगवेगळे अनुमान काढले. या अभ्यासातून भारतातील कोरोनाच्या प्रसारामध्ये सुपरस्प्रेडर्सनी महत्वाची भूमिका बजावल्याचे लक्षात येते. या 10 टक्के रूग्णांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार केला आणि 60 टक्के नव्या रुग्णांची भर टाकली. तर 70 टक्के रूग्णांनी कोणताही प्रसार केला नाही.
20 ते 44 वयोगटातील लोकांकडून कोरोनाचा प्रसार अधिक होतो असे हा अभ्यास स्पष्ट करतो. तसेच लहान मुलेदेखील कोरोनाचा प्रसारात महत्वपूर्ण भूमिका बजावतात हे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मीनारायण म्हणतात की, "लहान मुले ही एकमेकांत आणि प्रौढ लोकांत कोरोनाचा प्रसार करतात हे दिसून आले आहे. मुलांमधील कोरोनाची तीव्रता ही सौम्य असते आणि त्याचे निदान होत नाही ही काळजीची बाब आहे." हा अभ्यास असेही सांगतो की समान वयोगटातील व्यक्तीमध्ये खासकरून बालकांच्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. साधारणत: 14 वर्षापर्यंतच्या मुलांत हे प्रमाण अधिक आहे.
जे लोक एकत्र राहतात, एक मीटरपेक्षा कमी शारीरिक अंतर ठेवतात, कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय एकत्रित प्रवास करतात त्यांचा कोरोना प्रसाराच्या उच्च धोका गटात समावेश केला गेला आहे. अशा 10 टक्के लोकांत कोरोनाचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे. तर शारीरिक अंतराचे नियम पाळून जर लोक एकत्र राहत असतील तर त्यांच्यात कोरोनाचा प्रसार 5 टक्क्याहून कमी दिसून आला आहे. त्यांचा कमी धोका गटात समावेश होतो. प्रवास करताना मास्कचा वापर केल्यास धोका कमी होतो का या प्रश्नावर संशोधकांनी त्याच्याकडे अपुरी माहिती असल्याचे सांगितले.
या दोन राज्यांत रुग्ण हे मृत्यूपूर्वी 5 दिवस दवाखान्यात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत हे प्रमाण 13 दिवस इतंके आहे. मृतांमध्ये वृध्दांचे प्रमाण जरी जास्त असले तरी 80 वर्षावरील वृध्दांचे मृत्यू प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण 62 टक्के इतके अधिक आहे. भारतीय लोकांत मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 40 ते 70 वयोगटातील लोकांत कोरोनाचे प्रमाण जास्त आहे. एकूण मृतांमध्ये 45 टक्के लोकांना मधुमेह होता. 50 ते 64 वयोगटातील मृतांची संख्या अधिक आहे. तसेच आपल्या देशात प्रदूषणाचे प्रमाणही जास्त असल्याने 40 वय गाठेपर्यंत भारतीयांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेही या वयोगटात कोरोनाचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होतंय.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांत प्राथमिक आरोग्य व्यवस्थेची स्थिती चांगली आहे. तसेच या दोन राज्यांत आरोग्य कर्मचारी व प्रति व्यक्ती आरोग्यावरील खर्च हा अधिक आहे असे या अभ्यासात नमूद केले आहे. या अभ्यासात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. हा अभ्यास देशातील यापुढील कोरोनासंबंधी धोरण ठरवण्यात महत्वपूर्ण ठरेल.