मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104 कोटींचा साठा जप्त
Rajasthan News : मुंबई पोलिसांनी डिसेंबर 2023 मध्ये तीन आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीमध्ये राजस्थानातील जोधपूरमधील एका औषधाच्या कंपनीची माहिती मिळाली होती.
Mumbai Police जोधपूर : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजस्थानातील औषध निर्मितीच्या कंपनीचा भांडाफोड केलेला आहे. मेफेड्रोन आणि इतर औषध बनवण्यासाठी वापरल्या जाणारी रसायनं देखील जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मु्द्देमालाचीरक्कम 104 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. मुंबई पोलिसांनी डिसेंबर 2023 मध्ये अंमली औषधांचा भांडाफोड करत तीन जणांना अटक केली होती. पोलिसांना त्यावेळी केलेल्या चौकशीत जोधपूरमध्ये चालवल्या जाणाऱ्या औषधाच्या कंपनीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या कंपनीचा भांडाफोड करत मालक हुकुमराम चौधरीला अटक केली आहे.
31 डिसेंबरला अटक
मुंबई पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. साकीनाका पोलीस स्टेशनच्या चंद्रकांत पवार यांना काही लोक मेफेड्रोन विकण्यासाी येत असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांनी या माहितीवरुन कारवाई करत सरफराज शेख (22),माजिद उमर शेख (44), अब्दुल कादर शेख (44) यांना अटक केली होती. या तीन आरोपींकडून त्यावेळी 3.335 कोटी रुपयांचं 1.655 किलोग्राम मेफेड्रोन जप्त केलं होतं.
डीसीपी मंगेश शिंदे यांनी मुंबईत या तीन आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींनी मेफेड्रोन कुठून खरेदी केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना अधिक चौकशी केली असता राजस्थानच्या जोधपूरमध्ये नशा वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.
मुंबई पोलिसांनी तीन आरोपींच्या कॉल डिटेल्सच्या आधारावर पुण्यातील प्रशांत पाटील या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. प्रशांत पाटीलकडे चौकशी केल्यानंतर जोधपूरच्या कारखान्याची माहिती मिळाली.
प्रशांत पाटील यानं मुंबई पोलिसांना सांगितलं की जोधपूरमधील हुकूमराम चौधरी जोधपूरच्या सचिन कदमच्या सांगण्यावरुन औषधाची कंपनी चालवत होता. यानंतर पोलिसांनी मेफेड्रोन आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. ज्याची किंमत 104 कोटी रुपये आहे.