देशात पुन्हा मोदी सरकार, एनडीएला 335 जागा मिळण्याची शक्यता, काँग्रेसची धाकधूक वाढवणारा सर्व्हे समोर
Mood of The Nation Survey : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) देशात एनडीए आणि इंडिया असा सामना रंगणार आहे.
Mood of The Nation Survey : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) देशात एनडीए आणि इंडिया असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात (Mood of The Nation Survey ) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणानुसार देशात आज सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर एनडीए हॅट्ट्रिक करू शकते. 543 पैकी एनडीएला 335 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, 166 जागा इंडिया ब्लॉकच्या खात्यात जाऊ शकतात. इतरांना 42 जागा मिळू शकतात. यापैकी भाजप एकहाती 304 जागा जिंकू शकतो. काँग्रेसला 71 तर इतरांना 168 जागा मिळू शकतात. राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप सर्व जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या राज्यात खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीला 72 जागा
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 52.1 टक्के मते मिळू शकतात. 2019 च्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढणार आहे. 2019 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 49.97 टक्के मतं मिळाली होती. भाजपला 80 पैकी 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपना दल पक्षाला दोन जागा मिळू शकतात. म्हणजेच, 80 पैकी एनडीएला 72 जागा मिळू शकतात. समाजवादी पार्टी पक्षाला सात जागा मिळतील. काँग्रेसला फक्त एका जागेवार समाधान मानावे लागेल. गतवेळच्या तुलनेत सपाला दोन जागाचा फायदा होईल. यावेळच्या निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळणार नसल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झालेय.
महाराष्ट्रातील स्थिती काय ?
सर्वेक्षणात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) भाजप-शिंदे-अजित पवार गटावर मात केल्याचे दिसत असून विरोधी आघाडीला 48 पैकी 26 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप महायुतीला 40.5 टक्के मते, तर काँग्रेस आघाडीला 44.5 टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे.
मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणा लोकसभेला महाराष्ट्रात 48 पैकी भाजपला 22 जागा, काँग्रेसला 12 जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 14 जागा मिळतात. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांना 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येऊन भाजपला विशेष फायदा होताना दिसत नाही. भाजप महायुतीला 40.5 टक्के, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 44.5 टक्के तर इतरांना 15 टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्य | एकूण जागा | भाजप + | काँग्रेस + | अन्य |
उत्तर प्रदेश | 80 | 72 | 1 | 7 |
बिहार | 40 | 32 | 8 | 0 |
झारखंड | 14 | 12 | 2 | 0 |
पश्चिम बंगाल | 42 | 19 | 1 | 22 |
मध्य प्रदेश | 29 | 27 | 2 | 0 |
छत्तीसगढ | 11 | 10 | 1 | 0 |
राजस्थान | 25 | 25 | 0 | 0 |
गुजरात | 26 | 26 | 0 | 0 |
गोवा | 2 | 1 | 1 | 0 |
महाराष्ट्र | 48 | 22 | 26 | 0 |
दिल्ली | 7 | 7 | 0 | 0 |
केरळ | 20 | 0 | 20 | 0 |
तामिळनाडू | 39 | 0 | 39 | 0 |
तेलंगाणा | 17 | 3 | 10 | 4 |
आंध्र प्रदेश | 25 | 0 | 0 | 25 |
कर्नाटक | 28 | 24 | 4 | 0 |
हिमाचल प्रदेश | 4 | 4 | 0 | 0 |
हरियाणा | 10 | 8 | 2 | 0 |
पंजाब | 13 | 2 | 5 | 6 |
उत्तराखंड | 5 | 5 | 0 | 0 |
जम्मू-कश्मीर | 5 | 2 | 3 | 0 |
आसाम | 14 | 12 | 2 | 0 |
एकूण | 504 | 313 | 127 | 64 |
कधी झाला सर्व्हे -
मागील दीड महिन्यात (15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024) हा सर्व्हे केला आहे. 35 हजार लोकांसोबत चर्चा केली तर वेगवेगळ्या पद्धतीने दीड लाख लोकांसोबत सर्व्हे केलाय. जर आज देशात लोकसभा निवडणूक झाली तर कुणाला किती जागा मिळतील ? असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला. भाजपवा 370 जागा मिळतील का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का ? जनतेमध्ये सर्वात लोकप्रिय कोण आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व्हेच्या माध्यमातून केला.
आणखी वाचा :
उत्तर प्रदेशमधील 80 पैकी फक्त एक जागा काँग्रेस जिंकणार, लोकसभेआधीच्या सर्वात मोठ्या सर्व्हेचा अंदाज