Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र
Ratan Tata: रतन टाटा यांच्या उद्योगपती आयुष्यात दडलेला साधा, सरळ आणि समाजाच्या मदतीला धावून जाणारा असामान्य व्यक्ती प्रत्येकजण आपल्या अनुभवातून उलगडत आहे.
Ratan Tata: मुंबई : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच, सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस, द ग्रेटेस्ट... या हॅशटॅगसह सोशल मीडिया भावुक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत. तसेच, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्राला करणारा प्रस्ताव संमत केल्याची माहिती दिली. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न (Bharatratna) देण्याची मागणी केली आहे.
रतन टाटा यांच्या उद्योगपती आयुष्यात दडलेला साधा, सरळ आणि समाजाच्या मदतीला धावून जाणारा असामान्य व्यक्ती प्रत्येकजण आपल्या अनुभवातून उलगडत आहे. त्यांच्या निधनानंतर जगभराती दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ट्विटरवर काही क्षणातच लाखो ट्विट्समधून रतन टाटांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले जात आहेत. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा -तोटा न पाहणारे रतन टाटा सांगण्याचा प्रयत्न नेटिझन्सकडून होत आहेत. तसेच, यापूर्वी करण्यात येत असेलली, भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. त्यामुळे, राज्य सरकारनेही तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत केला आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे.
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसेच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी नरेद्र मोदींकडे मागणी केली आहे.
अशा व्यक्ती भारतरत्नच नाहीत तर मग काय?
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक 2 मिनीट स्तब्ध उभे राहीले. आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ?, असा सवालही राज यांनी मोदींकडे विचारला आहे. तसेच, याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले.
मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये
भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे, अशी अपेक्षाही राज यांनी पत्रातून व्यक्त केलीय.