हुंड्यासाठी दररोज छळ, अवघे 27 दिवस आणि 4 वर्षाच्या 2 चिमुरड्यांसह 3 सख्ख्या बहिणींची सामूहिक आत्महत्या, दोघी होत्या गर्भवती
आत्महत्या केलेल्या तिघींमधील दोघी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तीनही बहिणींना सासरी हुंड्यासाठी जाच होत होता तसेच मारहाणही केली जात होती. त्यामुळे कंटाळून झालेल्या बहिणींनी आपली जीवनयात्रा संपवली.
जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या एका घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या बहिणींनी आपल्या 2 चिमुरड्या मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण समाजमन हादरले आहे. आत्महत्या केलेल्या महिलांची नावे कालू मीना, ममता आणि कमलेश असल्याचे सांगितले जात आहे.
तीन बहिणींचे वय अनुक्रमे 25, 23, आणि 20 वर्ष होते, तर एक मुलगा 4 वर्षांचा मुलगा होता, तर दुसरा केवळ 27 दिवसांचा होता. आत्महत्या केलेल्या तिघींमधील दोघी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या महाभयंकर प्रसंगानंतर पीडित कुटुंबाने तीनही बहिणींना सासरी हुंड्यासाठी जाच होत होता असा आरोप केला आहे तसेच मारहाणही केली जात होती. त्यामुळे हैराण झालेल्या बहिणींनी आपली जीवनयात्रा संपवली.
मृत बहिणींचा चुलत भाऊ हेमराज मीनाने सांगितले की, माझ्या बहिणींना हुंड्यासाठी छळ केला जात होता. त्या 25 मे पासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि महिला हेल्पलाईन प्राथमिक तक्रार नोंदवली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागितली होती, पण आम्हाला मदत मिळाली नाही.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या बहिणींनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही, पण कुटुंबातील सदस्यांनी छोट्या बहिणीचा व्हाॅटसअॅप स्टेट्स शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, आम्ही जात आहोत. आनंदी रहा. आमच्या मृत्यूचे आमच्या सासरचे लोक आहेत. दररोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं.
त्यामुळे सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुढील जन्मात एकाचवेळी जन्म घेऊ. आम्हाला मरायचे नव्हते, पण आमच्या सासरच्या लोकांनी आम्हाला छळले होते. आमच्या मृत्यूमध्ये आमच्या आई वडिलांचा काही दोष नाही. बहिणी बेपत्ता झाल्यानंतर 4 दिवसांनी पोलीसांनी शनिवारी सकाळी दूदू गावातील विहिरीतून तीन बहिणी आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.
पोलीसांनी एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, पीडितांचे पती आणि सासरमधील लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोपही लावला जाईल. पोलीस तीन बहिणींच्या पतीसह सासू आणि अन्य लोकांकडे चौकशी करत आहेत.
राजस्थानमधील महिला कार्यकर्त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी चार दिवस लावल्याने त्यांच्याविरोधातही कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचलं का ?