(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mann ki Baat : गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश पूर्ण ताकतीनं लढतोय: पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, तर एकूण कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने त्यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : भारतावर कोरोनाचे भयानक संकट आलेलं असताना देशातील नागरिकांनी धैर्य दाखवलं, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या महामारीमुळे आलेल्या अनेक संकटांना देशाने यशस्वीपणे तोंड दिलंय. या दरम्यान अम्फान, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते, यास वादळ तसंच अनेक ठिकाणी भूकंप आणि नैसर्गित आपत्ती आल्या. त्यांचाही देशाने चिकाटीने मुकाबला केला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 77 व्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, या कोरोना काळात ज्या राज्यांत चक्रीवादळ आले त्या राज्यांतील लोकांनी ज्या प्रकारचे साहस दाखवलं ते कौतुकास्पद आहे. या संकटाच्या समयी त्यांनी मोठ्या धैर्याचं दर्शन दाखवलं. राज्य शासन आणि प्रशासन दोघांनीही एकजुट होऊन या आपत्तीचा सामना केला.
मोदी सरकारच्या आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, तर एकूण कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या काळात ज्यांचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान झालंय त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी देशात केवळ एकच टेस्टिंग लॅब होती, आता देशात अडीच हजारांहून जास्त लॅब कार्यरत आहेत, तसेच त्यांच्या माध्यमातून रोज 20 लाखांहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "या कठीण काळात देशातील ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे समोर आली. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून देशात ऑक्सिजनची वाहतूक ही अत्यंत जलद आणि मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला."
आपल्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचं सांगत मोदी म्हणाले की, "या सात वर्षाच्या काळात आपण 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्रावर देशाचा कारभार केला. देशासाठी प्रत्येक क्षण हा समर्पित भावनेनं काम केलं. या काळात अनेक समस्या आल्या पण प्रत्येक वेळी आम्ही मजबूत झालो. मला या काळात अशा अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या ज्यांच्या गावात गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. अनेक लोकांनी सांगितलं की त्यांच्या गावात पहिल्यांदाच पक्के रस्ते तयार झाले, ती गावं शहरांशी जोडली."
महत्वाच्या बातम्या :
- 7 Years of Modi Government : मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण; पण देशाचा कारभार काँग्रेसच्याच कामगिरीवर सुरु - संजय राऊत
- Modi Govt 2.0 : मोदी सरकारच्या सत्तेची सात वर्षे पूर्ण; राज्यात काँग्रेस नेते केंद्राविरोधात रस्त्यावर उतरणार
- Mehul Choksi : मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी पूर्ण? भारताचं विमान डॉमिनिकात दाखल