Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...
Mahakumbh 2025 stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Mahakumbh Stampedeप्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. संगम घाटावर अमृतस्नानासाठी जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्यानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सर्व 13 आखाड्यांनी आज होणारं अमृतस्नान रद्द केल्याची माहिती आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारकडे त्यांनी या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
साध्वी निरंजन ज्योती काय म्हणाल्या?
आखाड्यानं या दु:खद घटनेनंतर अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतल्याचं साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितलं. या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करत सरकारकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली. याशिवाय या प्रकरणात साध्वी निरंजन ज्योती यांनी विरोधी पक्षांना इशारा दिला आहे. विरोधकांनी यावर राजकारण करु नये, असं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या.
साध्वी निरंजन ज्योती पुढं म्हणाल्या की ही दु:खद घटना आहे. या घटनेवर कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये.या प्रकरणात आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणा समोर आलेला नाही. आतापर्यंत 5 कोटी लोकांनी सुरक्षितपणे स्नान केल्याचं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या. महंत राजूदास यांनी प्रशासनासोबत आघाड्यांची बैठक सुरु असल्याची माहिती आहे.
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू : सूत्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरी मध्यरात्री एक वाजता घडली. या घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. जखमींची संख्या 50 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या भाविकांना संगम घाटावरच अमृतस्नान करायचं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. स्नानासाठी ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत असताना ही दुर्घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमेळ्यातील या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेत मदत कार्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, आनंद आखाड्यात 10 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी जी यांनी आखाड्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
इतर बातम्या :