Lumpy Skin Disease : राजस्थानमध्ये लम्पी स्कीनमुळं पशुपालक चिंतेत, दूध उत्पादनात दोन लाख लिटरची घट, मुख्यमंत्री गेलहोतांचे पंतप्रधानांना पत्र
राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठ्या प्रमाणावर जनवारांना लम्पी स्कीन आजार झाला आहे. यामुळं तेथील दूध उत्पादनावर (Milk production) मोठा परिणाम झाला आहे.
Rajasthan Lumpy Skin Disease : सध्या देशात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा ( Lumpy Skin Disease) धोका वाढत आहे. यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठ्या प्रमाणावर जनवारांना लम्पी स्कीन आजार झाला आहे. यामुळं तेथील दूध उत्पादनावर (Milk production) मोठा परिणाम झाला आहे. दुधाच्या उत्पादनात दोन लाख लीटरची घट झाली आहे. दुधाचं उत्पादन घटल्यानं मिठाईच्या किंमती देखील वाढल्या आहेत. राजस्थानमधील सर्वात मोठी दूध सहकारी संस्था जयपूर डेअरी फेडरेशनच्या मते, दूध संकलनात 15 ते 18 टक्के घट झाली आहे. मात्र, आजतागायत दूध पुरवठा खंडित झालेला नाही.
जयपूर डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष ओम पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन दूध संकलन 14 लाख लिटरवरून 12 लाख लिटरवर आले आहे. जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा संसर्ग सुरु होण्यापूर्वी आम्हाला दररोज 14 लाख लिटर दूध मिळायचे. परंतू आता ते 12 लाख लिटर झाले आहे. मात्र, दूध पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आला नसल्याची माहिती देखील ओम पुनिया यांनी दिली आहे. आम्ही प्राण्यांच्या मृत्यूबद्दल चिंतित आहोत. कारण अधिकृतपणे दिलेली आकडेवारी निश्चितपणे त्यापेक्षा जास्त आहे. हे असेच चालू राहिल्यास कोविड-19 किंवा त्याहूनही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो असेही ते म्हणाले.
राजस्थानमध्ये 51 हजार जनावरांचा मृत्यू
राजस्थानमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला आहे. 11 लाखांहून अधिक जनावरे या आजारामुळं प्रभावित झाली आहे. तर राजस्थानमध्ये लम्पी स्कीनमुळं 51 हजार गुरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 12.32 लाख गुरांना लसीकरण करण्यात आले आहे.
मिठाईचे दरात वाढ
लम्पी स्कीन आजारामुळं दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होत आहे. मिठाईच्या किंमती पूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. सर्व मिठाई माव्यापासून बनवल्याचे मिठाई विक्रेते सांगतात. दुधाचा पुरवठा कमी झाल्यानं त्यांचे उत्पादन 80 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळं त्यांना किंमती वाढवाव्या लागल्या आहे.
मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मदतीची मागणी
राजस्थानमध्ये लम्पी स्किनचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण पशुपालन हा राजस्थानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या वाळवंटी राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत दूध आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून 13 राज्यांमध्ये पसरलेल्या त्वचेच्या आजाराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात गेहलोत यांनी लम्पी स्कीन या आजाराशी लढण्यासाठी अतिरिक्त मदतीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: