आजपासून घरगुती सिलेंडर स्वस्त, बँकेच्या व्यवहार शुल्कातही बदल
गॅस कंपन्यांनी देखील सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. तर महिंद्रा आणि मारुतीच्या गाड्यांच्या किमतीतही बदल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : आजपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. रेल्वेच्या जवळपास 250 हून अधिक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या व्यवहारांसाठीच्या फीमध्ये काही बदल केले आहेत. गॅस कंपन्यांनी देखील सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. तर महिंद्रा आणि मारुतीच्या गाड्यांच्या किमतीतही बदल झाले आहेत.
घरगुती गॅस स्वस्त
आजपासून विनाअनुदानित सिलेंडर जवळपास 100 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ग्राहकांना आजपासून सिलेंडर 737.50 रुपयांऐवजी 637 रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने आता अनुदानित सिलेंडरचे दर देखील 449.35 झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे.
आरटीजीएस-एनईएफटी शुल्कात बदल
ऑनलाईन व्यवहारात आरटीजीएस (रिअल टाईल ग्रॉस सेटलमेंट) आणि एनईएफटीद्वारे (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) पैशांचे व्यवहार करणे आजपासून मोफत होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीजीएस आणि एनईएफटी अशा व्यवहारांवर कोणतंही शुल्क घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या व्यवहारांसाठी आरटीजीएस प्रणालीचा वापर केला जातो, तर एनईएफटी प्रणालीचा वापर दोन लाखांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी होतो.
एसबीआयने आपल्या गृह कर्जवारील व्याज दर रेपो रेटशी जोडणार आहे. यामुळे रेपो रेटच्या बदलानुसार गृह कर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होणार आहे.
चारचाकी गाड्यांच्या किमतीत वाढ
महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या गाड्यांच्या किंमतीत 36 हजारांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे स्कॉर्पिओ, बोलेरो, एक्सयूव्ही 500 इत्यादी गाड्या महाग होतील. मारुती सुझुकीने सेडान कारच्या किमतीत 12 हजारांपर्यंत वाढ केली आहे.