Lok Sabha Election 2024 Survey : आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोणत्या राज्यात कोणाला मिळणार विजय? महाराष्ट्रात भाजपला किती जागा?
Lok Sabha Election Opinion Poll : 'टाईम्स नाऊ -ईटीजी' यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वे केला आहे. आता निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आता लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी इंडिया (India Alliance) आघाडीची स्थापना केली आहे. तर, भाजपने एनडीए (BJP led NDA) आणखी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. तर, काही पक्षांनी दोन्ही आघाड्यांपासून समान अंतर ठेवले आहे. 'टाईम्स नाऊ -ईटीजी' यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वे केला आहे. आता निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिंदी भाषिक राज्यात कोणाचे वर्चस्व
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 68-70 जागांवर विजय मिळू शकतो. तर, एनडीए आघाडीला 69-73 जागा मिळू शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 62 जागांवर विजय मिळाला होता. तर, एनडीए आघाडीला 64 जागांवर विजय मिळाला होता.
तर, राजस्थान, हिमाचल, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये भाजपला कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकसभेपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राजस्थानमध्ये भाजपला 25 पैकी 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात भाजपला 22-24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपचे वर्चस्व राहण्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 6 ते 8 जागांवर विजय मिळू शकतो. तर, काँग्रेसला 3 ते 5 जागांवर विजयाचे समाधान मानावे लागू शकते.
बिहारमध्येही भाजपच्या एनडीएला लोकसभेच्या 40 पैकी 22-24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने महाआघाडी केली आहे. असे असले तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे वर्चस्व कायम राहणार आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नितीशसोबत राहूनही भाजपने 17 जागांवर विजय मिळाला होता. नितीश यांच्या जेडीयूला 16 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्येही भाजपला 14 पैकी 10-12 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय?
उत्तर प्रदेशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. मागील निवडणुकीत 48 जागांपैकी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. या वेळीही भाजपला 22-24 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर एनडीए आघाडीला 32-36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचा अंदाज टाइम्स नाऊ-ईजीटीने सर्वेमध्ये व्यक्त केला आहे.
गुजरात, उत्तराखंड आणि गोव्यात भाजप सर्व विरोधकांचा धुव्वा उडवताना दिसत आहे. सर्वेनुसार, गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या 5 आणि गोव्याच्या दोन्ही जागाही भाजपच्या गोटात येण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश दिल्ली, हिमाचल, लडाख आणि ईशान्येकडील 9 जागांवर भाजपचे वर्चस्व राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरयाणा, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, विरोधकांचा प्रभाव कोणत्या राज्यांमध्ये?
काँग्रेसचा सर्वाधिक प्रभाव फक्त केरळ मध्ये दिसून येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील निवडणुकीत केरळने 15 जागा जिंकल्या होत्या. त्याशिवाय, लक्षद्विप, मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, पाँडिचेरीमध्ये काँग्रेसला विजय मिळण्याचा अंदाज आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चुरस असणार आहे. पंजाबमधील 13 पैकी 6 ते 8 जागांवर आपला यश मिळू शकते. तर 5 ते 7 जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो.
प्रादेशिक पक्षांचा दबदबा राहणार
ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात प्रादेशिक पक्षाचा जोर दिसून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओदिशात बिजू जनता दलला 11 ते 13 जागांवर विजय मिळू शकतो. तर, तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे वर्चस्व कायम राहणार आहे. डीएमकेला 22 ते 24 जागांवर विजय मिळू शकतो.
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला 20 ते 22 आणि तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला 7 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणात भाजपला 4 ते 5 जागा मिळू शकतात.