गुजरातमधील राजकोटमध्ये मजुरांचा एबीपी अस्मिताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला
गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील सापर वेरावल या ग्रामीण भागात मजुरांनी एबीपी अस्मिता चॅनेलच्या रिपोर्टवर जीवघेणा हल्ला केला.
राजकोट : गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील सापर वेरावल या ग्रामीण भागात कंपनीत काम करणाऱ्या मजुरांनी एबीपी अस्मिता चॅनेलच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना उत्तर प्रदेशसाठी रेल्वे गाडी जाणार होती. मात्र, ती अचानक रद्द झाली. हे समजताच रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या हजारो मजुरांनी गोंधळ करायला सुरुवात केली. यावेळी काहीजण रेल्वे स्थानकातील वस्तुंचे नुकसान करत होते. या मजुरांचा गोंधळ एबीपी अस्मिताचे रिपोर्टर हार्दिक याने कॅमेऱ्यात टिपण्यासा सुरुवात केली. हे गोंधळ करणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हार्दिककडे वळवत त्याला जबर मारहाण केली.
लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातील मजुर अडकले आहेत. त्यांना घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे. या ठिकाणावरुन आतापर्यंत 10 रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशच्या मजुरांना घेऊन गेल्या आहेत. आजही एक रेल्वे जाणार होती. यासाठी हजारच्या आसपास मजुर रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. मात्र, अचानक रेल्वे गाडी रद्द झाल्याचे समजल्याने मजुर संतप्त झाले. त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. काहींनी तर स्थानकाचे नुकसान करायला सुरुवात केली. या सर्व गोंधळाचे रिपोर्टींग एबीपी अस्मिता टिव्ही चॅनेलचे रिपोर्टर हार्दिक करत होता.
Nirmala Sitharaman | गरीब, गरजूंच्या खात्यात पैसे ट्रान्सफर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
आपले चित्रकरण होत असल्याचे लक्षात येताच मजुरांनी हार्दिकवर हल्ला करण्यास सुरुवात केली. लोकांनी रेल्वे रद्द झाल्याचा सर्व राग पत्रकारावर काढल्याचे दिसून आले. यात हार्दिक मोठ्या प्रमाणात जखमी झाला. या गोंधळावेळी पोलीसही तिथे उपस्थित होते. मात्र, त्यांच्यावरही या मजुरांनी हात उचलल्याचे पाहायला मिळाल्याची माहिती एबीपी अस्मिताचे संपादक रौनक पटेल यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 15 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
पत्रकारांवर हल्ला करणे चुकीचे कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकार कोरोनाची प्रत्येक अपडेट लोकांपर्यंत पोहचवत आहे. यात तो स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. अशात त्यांच्यावर हल्ला होणे निंदणीय असल्याचे सर्व पत्रकार बांधवाचे म्हणणे आहे. या हल्ल्यानंतर तिथल्या सर्व पत्रकारांनी जवळच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.