आजही सोन्याचे दर कमीच, जाणून घ्या का सातत्याने कमी होतेय सोन्याची किंमत
जगभरात कोरोना लसीकरण सुरु झालं असून, आर्थिक गणितं पुन्हा रुळावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात होणारी कपात मात्र काहीशी आश्चर्यकारक आहे.
मुंबई : जगभरात कोरोना लसीकरण सुरु झालं असून, आर्थिक गणितं पुन्हा रुळावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात होणारी कपात मात्र काहीशी आश्चर्यकारक आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. आजच्या दिवशी सोन्याच्या दरांनी 44 हजार रुपये प्रती तोळा इतका दर गाठला आहे. अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे की, येत्या दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होऊ शकतात.
मागील वर्षी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी 56 हजार रुपये प्रची तोळा अशी विक्रमी किंमत गाठली होती. आता मात्र अनेक देशांचा किंबहुना भारताचाही आर्थिक गाडा वेग धरु लागलेला असताना दर कमी होणं, ही बाब अनेकांना थक्क करणारी आहे.
सोमवारीसुद्धा दर घसरले....
वायदा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 0.31 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं हे दर प्रती 10 ग्रामसाठी 44,544 रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजार, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 1,697.00 डॉलर वर पोहोचलं.
International Women's Day 2021 Video | कणखर महाराष्ट्रातील कातळ'राण्या' पाहिल्या का?
दरांमध्ये घट होण्यामागची कारणं नेमकी काय?
कोरोना लसीकरणाच्या सत्राला सुरुवात झालेली असतानाच सोन्याचे दर मात्र कमीच होत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये झालेली वाढ हेसुद्धा यामागचं एक कारण ठरत आहे. जगभरातील गुंतवणुकदार अमेरिकन बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, परिणामी याचे पडडसाद दरांवर उमटले आहेत.
वर्ल्ड गोल्ड काउंसिल इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष पीआर सोमसुंदरम यांच्या मते बॉन्ड यील्ड वाढून सोन्याच्या दरांत घट झाल्यामुळं Gold ETFs ची होल्डिंग 2 टक्क्यांनी कमी झाली आहे.