(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इमरती देवी यांचा 'आयटम' उल्लेख, टीकेनंतर कमलनाथ यांच्याकडून खेद
एका निवडणूक सभेदरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांचा 'आयटम' असा उल्लेख केला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अखेर त्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवींच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर खेद व्यक्त केला असून कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असे सांगितले. त्यांनी भाजप हा राज्यातील मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करत आहे, पण आपण त्यांना यशस्वी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका निवडणुकीच्या रॅली दरम्यान त्यांनी इमरती देवींचा 'आयटम' असा उल्लेख केला होता.
कमलनाथ यांनी म्हटले आहे की, "आज भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ते अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टींच्या आधारे राज्यातील मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत 15 वर्षातील आणि गेल्या 7 महिन्यातील भाजप सरकारच्या काळातील मुद्दे हेच खरे मुद्दे आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांचे नेते काहीही बोलत आहेत." ते पुढे म्हणाले की, "मी महिलांचा सन्मान करतो. जर कोणाला माझे वक्तव्य महिलांचा असन्मान करणारे वाटत असेल तर त्यावर मी खेद व्यक्त करतो."
कमलनाथांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंदोलन केले. त्यांच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी यावर एक दिवसांचे मौन व्रत ठेवले. शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथांच्या या वक्तव्याला महाभारतातील द्रौपदीच्या अपमानाशी जोडले आणि ते म्हणाले, "मला यावर स्पष्टीकरण अपेक्षित होते. पण अशा आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. तुम्ही मला काहीही नावे ठेवू शकता, माझ्यावर काहीही टीका करु शकता पण अशीरीतीने नवरात्रीच्या काळात एका महिलेचा अपमान करणे हे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यासारखे आहे. याबाबतीत कमलनाथांनी सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत."
या मुद्द्यावरुन इमरती देवींनी कमलनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी त्यांचा कमलनाथ नाही तर 'कलंकनाथ' असा उल्लेख केला. त्या पुढे म्हणाल्या की, "मी एका गरीब घरातून राजकारणात आली आहे. घरदार सांभाळून मला राजकारण करावे लागते. कमलनाथांच्या वक्तव्यावरुन लक्षात येतं की त्यांचा महिला राजकारणात याव्यात या गोष्टीला विरोध आहे आणि असे जर असेल तर ते कमलनाथ नाहीत तर कलंकनाथ आहेत."
कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या इमरती देवी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया याच्यासोबत कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना डबरा या विधानसभेच्या जागेवर उमेदवारी दिली आहे. रविवारी या मतदारसंघातले कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र राजे यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणात कमलनाथांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.