JEE Main, NEET Exam Dates: नीट परीक्षा 13 सप्टेंबरला, NTA ने केलं स्पष्ट; अॅडमिट कार्ड लवकरच रिलीज होणार
JEE Main, NEET Exam Dates Confirmed: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती.
NEET 2020 | जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.
अनेक नेत्यांचा विरोध
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, चिराग पासवान आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नीट परीक्षा आणि जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नीट आणि जेईई परीक्षा दिवाळीपर्यंत न घेण्याची आणि तसे निर्देश शिक्षण मंत्रालयाला देण्याची मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिक फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.