(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir | दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यास संरक्षण दलाला यश, धक्कादायक माहिती उघड
त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये असणाऱ्या बडगाम येथे त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
श्रीनगर : जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्करानं एका संयुक्त कारवाईमध्ये लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. या दहशतवाद्यांना ताब्याच घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये असणाऱ्या बडगाम येथे त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
दहशतवाद्यांसाठी तळ बनवणं आणि शस्त्रास्त्र पुरवण्याची करायचे मदत
पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनंतर जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि लष्कराची 53 आरआर, 43 बीएन सीआरपीएफ या तुकड्यांनी बडगाम येथील हायहामा आणि हुकाहामा या भागांत शोधमोहिम सुरु केली. या मोहिमेमध्ये त्यांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. हे दहशतवादी संघटनांना तळ बनवून देण्यास फक्त मदतच करत नव्हते, तर हत्यारं पुरवणे आणि हल्ल्याच्याठीच्या ठिकाणांची रेकी अर्थात पाहणीही करत होते अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आकिब अहमद वाणी आणि आदिल मंजूर मीर अशी आहेत. यांच्याकडून दहशतवादी संघटनांचे पोस्टर, बॅनर आणि इतर काही सामान हाती लागलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमेपलीकडे असणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या कमांडरशी थेट संपर्कात होते.
जम्मू काश्मीरमध्ये सरकारचा मोठा निर्णय, पर्यटकांनो हे नक्की वाचा
तरुणांना दहशतवादाच्या वाटेवर नेण्याचा मनसुबा
ताब्यात घेण्यात आलेले हे दोन्ही दहशतवादी येत्या काळात काही नव्या तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये लोटण्यासाठी दहशतवादी हँडलरर्सच्या ताब्यात देण्याच्या तयारीत होते. त्यांनी यासाठी काही मुलांची निवडही केली होती. पण, पुढे कोणताही अनुचित प्रकार होण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात गेतलं.
बडगामममध्ये सदर प्रकरणी अनेक कलमांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शिवाय पुढील तपासही सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तपासाच्या बळावर येत्या काळात आणखी काहीजणांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं.