नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीनंतर सीमेवरील परिसरात सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
श्रीनगर : नववर्षाच्या सुरुवातीलाच भारत-पाकिस्तान सीमेवरुन दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. आज सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरजवळ नियंत्रण रेषेवर दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीनंतर सीमेवरील परिसरात सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती मिळताच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करताना खारी थरयाट जंगल परिसरात रोखण्यात आलं. मात्र दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारानंतर भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार केला होता. या गोळीबारात भारतीय सैन्याचे एक ज्युनियर कमिशन अधिकारी (जेसीओ) शहीद झाले होते. पाकिस्तानी सैनिकांनी यावेळी बॉम्ब हल्लाही केला. पाकिस्तानी सैन्यांनी डागलेले बॉम्ब रहिवाशी परिसरात कोसळले. या स्फोटामध्ये दोन नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
संबंधित बातम्या