(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताचा एक जवान शहीद झाला तर पाकिस्तानचे तीन सैनिक मारु : भारतीय सेना
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारताकडूनही वेळोवेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानला शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भारत-पाक सीमेवर तणावाची स्थिती आहे. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारताकडूनही वेळोवेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानला शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय सैन्याने स्पष्ट केले आहे की, जर एलओसीवर (नियंत्रण रेषेवर) भारताचा एकही जवान शहीद झाला तर पाकिस्तानचे कमीत कमी तीन सैनिक मारले जातील. भारतीय सैन्यातील सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितले की, एलओसीवर भारत आणि पाकिस्तानच्या मारल्या गेलेल्या सैनिकांचं प्रमाण हे 1:3 इतके आहे. गरज पडल्यास ते अजून वाढवलं जाईल. काल पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. त्यानंर भारतीय सैन्याने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेजवळ रामपूर सेक्टरमध्ये (उरीजवळ) युद्धविरामाचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैनिकानी केलेल्या गोळीबारात भारतीय जवान सुभेदार वीराशा कुरहाठी शहीद झाले. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग असलेल्या आयएसपीआरने ट्वीट करुन माहिती दिली आहे की, भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये आपले (पाकिस्तानचे) दोन जवान मारले गेले आहेत.