बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरु आहे का?
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर काल बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर काल बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. केंद्रातल्या भाजप सरकारनं याबाबत गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंगालची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरु आहे का असाही सवाल उपस्थित होतोय.
आगीशी खेळू नका...माफी मागा...हा इशारा आहे राज्यपालांनी एका मुख्यमंत्र्यांना दिलेला..फार क्वचित वेळा असं होतं की खुद्द राज्यपाल पत्रकार परिषद घेऊन असा आरोप करतात. पण बंगालमध्ये जो धुडगूस सुरु आहे. त्यामुळे राज्यपाल जगदीप धनखड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर काल दगडफेक झाली. नड्डा यांची गाडी बुलेटप्रुफ असल्यानं त्याचं नुकसान झालं नाही. पण भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीवर पडलेल्या दगडविटांची दृश्यं टीव्हीवर दिसली.
या घटनेची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं कारवाई सुरु केली आहे. प. बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयानं 14 डिसेंबरला दिल्लीत हजेरीचे आदेश दिले आहेत. बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांना रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांनी तो अवघ्या तासांत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पाठोपाठ अमित शाह 19 डिसेंबरला बंगालचा दौरा करण्याचीही शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मात्र तृणमूल काँग्रेसवरचे हे आरोप नाकारले आहेत. शिवाय भाजपवाले स्वताच स्वतावर असे हल्ले घडवून आणत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय.
अशा सगळया हालचाली सुरु असताना बंगालमध्ये नेमकं काय कडक पाऊल सरकार उचलणार हे पाहावं लागेल. राष्ट्रपती राजवटीची मागणी याच्या आधीपासूनही काही भाजप नेत्यांनी केलेली आहेच. मग आता राष्ट्रीय अध्यक्षांवर हल्ला झाल्यावर भाजप निवडणुकांच्या तोंडावर ती रिस्क घेणार का पाहावं लागेल. एप्रिल मे मध्ये बंगालमध्ये निवडणुका आहेत त्याआधीच बंगालचं मैदान तापलं आहे.
संबंधित बातम्या :