(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरण, भाजप आक्रमक, बंगालच्या राज्यपालांचे ममतांवर आरोप
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नड्डा यांच्या गाडीवर काल दगड फेकण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आज मुंबईमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. तिकडे बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था खूप खराब आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. कायदा व्यवस्थेसंदर्भात याप्रकरणी राज्याचे मुख्य पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांना समन्स पाठवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा मुंबईमध्ये भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. खार पश्चिम मधील शिवराज हाईट या आपल्या निवासस्थानाबाहेर भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. ममता हटाव बंगाल बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. पश्चिम बंगालमधील नागरिकांना घेऊन राम कदम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. राज्यपालांना भेटून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.
बंगालचे राज्यपाल म्हणतात, ममता बॅनर्जी माफी मागा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी पत्रकार परिषद घेऊन बंगालच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था खूप खराब आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था नव्हती. संविधानाची सुरक्षा करणं माझी जबाबदारी आहे. लोकांची सुरक्षा करणं माझी जबाबदारी आहे. ममता सरकारला संविधानाचं पालन करावंच लागेल. बंगालमध्ये जे होत आहे ते चांगलं नाही. कालचा हल्ला लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. बंगालमध्ये संविधानाच्या सीमा तोडल्या जात आहेत. कालच्या घटनेसाठी ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
जेपी नड्डांच्या ताफ्यावर काल झाला होता हल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी सकाळी हल्ला झाला. ते पार्टी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी डायमंड हार्बरकडे चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीयसह काही नेते जखमी झाले. बुलेट प्रूफ कारमधील नड्डा यांना मात्र काही इजा झाली नाही. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व ममता बनर्जी यांचे भाचे अभिषेक बनर्जी करत आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालसह देशभरात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ममता सरकारचा निषेध केला आहे.