(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदींना मिळणार शांततेचा पुरस्कार? Nobel Prize समिती सदस्य भारतात, मोदींचं भरभरुन कौतुक
Nobel Prize For PM Modi: पंतप्रधान मोदींना शांततेचा नोबेल मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण ठरतंय Nobel Prize समिती सदस्यांनी मोदींचं केलेलं भरभरून कौतुक.
Nobel Prize For PM Modi: रशिया-युक्रेन युद्ध तब्बल वर्षभरापासून सुरु आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भारत मात्र हे युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. युरोपमधील रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याच्या भारताच्या प्रयत्नाचं नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे उपनेते अॅस्ले टोजे (Asle Toje) यांनी भारताचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच, त्यांनी मोदींच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युद्धासंदर्भात ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना समजावून सांगितलं ते कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल कठोर संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे, असं म्हणत नोबेल समितीचे उपनेते अॅस्ले तोजे यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.
मोदी अत्यंत विश्वासू नेते, ते शांतता प्रस्थापित करु शकतात : अॅस्ले टोजे
पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना नोबेल समितीचे नेते अॅस्ले टोजे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात. पंतप्रधान मोदी हे अत्यंत विश्वासू नेते आहेत, ते शांतता प्रस्थापित करु शकतात. तसेच, पंतप्रधान मोदी हे जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत आणि ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत."
टोजे म्हणाले की, "मला आनंद आहे की, मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचं काम करत नाहीत. तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवरही काम करत आहेत. जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे. भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे."
नोबेल पुरस्कार कोणाला दिला जातो?
स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल फाऊंडेशनतर्फे नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल फाऊंडेशनची स्थापना 29 जून 1900 रोजी झाली आणि नोबेल पारितोषिक 1901 पासून देण्यात आलं. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि रसायनशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक आणि नॉर्विजन नोबेल समिती शांतता क्षेत्रात प्रदान करते.
नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, साहित्य, वैद्यकीय विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात दिला जाणारा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारताशी संबंधित दहा जणांना आतापर्यंत वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :