Weather Forecast : उत्तर भारतात थंडीचा कहर कायम, हलका पाऊस पडण्याची शक्यता
मागील तीन दिवसापूर्वी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि गारपीटीमुळे पुन्हा गारठा वाढला आहे. आज सकाळी देखील दिल्लीत हलका पाऊस झाला आहे.
All India Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. मागील तीन दिवसापूर्वी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि गारपीटीमुळे पुन्हा गारठा वाढला आहे. दरम्यान, आज सकाळी दिल्लीत हलका पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून हलक्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार वारे वाहत असल्याने हवेत गारवा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात तापमानात चढ उतार सुरुच आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे पोहोचला आहे.
आज सकाळी दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाण 40 ते 93 टक्के होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील हवामान बदलाचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. त्याच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या मध्यवर्ती भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांव्यतिरिक्त आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
बिहार
बिहारमध्ये तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तिथे सूर्यप्रकाश पडत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. पण, रविवारी सकाळी बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा किंचीत थंडी वाढली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन दिवसांत येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर वाऱ्याची ही प्रक्रिया आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंजाब
पंजाबमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस झाला होता. सोसाट्याचा वारा सुरु असल्याने तिथे गारठा वाढला होता. त्यानंतर रविवारी सूर्यप्रकाश पडल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या आणि परवा येथे हवामान स्वच्छ असेल. 1 मार्चपासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
हरियाणा
सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हरियाणामध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला होता. तर गारपिटीच्या बातम्याही समोर येत आहेत. यानंतर सोसाट्याचा वारा सुटल्याने सायंकाळी पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. रविवारच्या आधी हरियाणामध्ये थंडीने निरोप घेतला होता. उन्हामुळे रात्री उकाडाही जाणवत होता. पण अचानक पाऊस पडल्याने थंडी पुन्हा वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: