Kadambini Ganguly : देशातील पहिल्या महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांची पुण्यतिथी; शेवटच्या श्वासापर्यंत महिला सबलीकरणासाठी कार्य
सामाजिक आणि सास्कृतिक जीवनात पुरुषांचा प्रचंड प्रभाव असताना कादंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करुन स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला.
Kadambini Ganguly Death Anniversary : देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या कादंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जातेय. कादंबिनी गांगुली यांना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर झगडावं लागलं पण त्यातूनही त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवा केली.
कादंबिनी गांगुलींचा जन्म 18 जुलै 1861 रोजी बिहारच्या भागलपूरमध्ये झाला. 1884 साली कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला होत्या. त्या काळात एखाद्या महिलेने वैद्यकीय शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणं म्हणजे दुर्मिळ होतं.
महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर मानल्या जातात. पण त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कार्याची छाप म्हणावी तितकी उमटली नाही. पण कादंबिनी गांगुली यांनी मात्र रुग्णांची सेवा करुन वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याची अन्यसाधारण छाप उमटवली.
कादंबिनी गांगुली या 1886 साली दक्षिण आशियातील युरोपियन मेडिसिनमध्ये ट्रेन होणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कादंबिनी गांगुली यांनी आपल्या कार्याचा ठसा वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही उमटवला. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर येणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या.
स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम सुरु
कादंबिनी गांगुली या 1892 साली ब्रिटनमध्ये गेल्या आणि डबलिन, ग्लासगो आणि एडनबर्ग मध्ये वैद्यकीय क्षेत्राचं प्रशिक्षण घेतलं. तिथून परत आल्यानंतर त्यानी स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यांनी कोलकात्याच्या लेडी डफरिन रुग्णालयात काम सुरु केलं आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस सुरु ठेवलं. कादंबिनी गांगुली यांचे निधन 3 ऑक्टोबर 1923 साली झालं.
सामाजिक आणि सास्कृतिक जीवनात पुरुषांचा प्रचंड प्रभाव असताना कादंबिनी गांगुली यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करुन स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला. कादंबिनी गांगुली या ब्राम्हो समाजाचे नेते द्वारकानाथ गांगुली यांच्या पत्नी होत्या.
संबंधित बातम्या :