Engineers Day : का साजरा केला जातो इंजिनिअर्स डे? एम. विश्वेश्वरय्या कोण होते?
Engineers Day 2021 : देशातील रचनात्मक विकासामध्ये एम. विश्वेश्वरय्या यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. एक सिव्हिल इंजिनिअर, विद्वान आणि राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.
Engineers Day : दरवर्षी संपूर्ण भारतात 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनिअर्स डे (Engineer’s Day) म्हणजे राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे महान सुपूत्र एम. विश्वेश्वरय्या याच्या जन्मदिवसानिमित्त देशात हा दिवस साजरा केला जातो. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या हे इंजिनिअरिंगमध्ये करियर करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी त्या वेळच्या मैसुर प्रांतात झाला. 1883 साली पुण्यातील सायन्स कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरी सुरु केली. त्यांनी 1912 ते 1918 या काळात मैसुर संस्थानचे दिवाण म्हणून काम केलं.
कर्नाटकातील 1932 सालच्या कृष्ण सागर डॅमची निर्मिती हा त्यांच्या अतुलनीय कामाचा मोठा पुरावा आहे. कृष्ण सागर डॅमची निर्मिती ही काही साधी गोष्ट नव्हती. त्या काळात सिंमेंट नसल्याने विश्वेश्वरय्या यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने 'मोर्टार' ची निर्मिती केली. कृष्ण सागर डॅम हा आशियातील सर्वात मोठा बांध आहे. या ठिकाणीच कावेरी, हेमवती आणि लक्ष्मण तीर्थ या नद्यांचा संगम झाला आहे.
मैसुरच्या विकासात त्यांनी मोठं योगदान दिलं असून त्यांना 'फादर ऑफ मॉडर्न मैसुर' असं म्हटलं जातं. इंजिनिअर्स महाविद्यालयात त्यांच्या नावाने आजच्या दिवशी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.
देशातील रचनात्मक विकासामध्ये एम. विश्वेश्वरय्या यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. एक सिव्हिल इंजिनिअर, विद्वान आणि राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 1955 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रयत्नांमुळे कृष्ण राजसागर, भद्रावती आयर्न अॅन्ड स्टील वर्क्स, मैसुर सॅन्डल ऑईल अॅन्ड सोप फॅक्टरी, मैसुर विश्वविद्यालय, बॅंक ऑफ मैसुर अशा अनेक महत्वाच्या संस्थांची निर्मिती झाली. त्यांच्या या कार्याचे स्मरण आणि राष्ट्रीय विकासात देशातील इंजिनिअर्सचे योगदान लक्षात घेऊन देशात इंजिनिअर्स डे साजरा केला जातो.
संबंधित बातम्या :
- Grand Parents Day : अभिनेत्री मिथीला पालकर भावूक, जुने फोटो शेअर करत दिला आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा
- Teachers Day 2021: 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो? त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
- World Coconut Day 2021 : आज साजरा केला जातोय जागतिक नारळ दिन; जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व