India Vs Pakistan War Mock Drill: हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर सर्वात आधी लाईट का बंद करायची असते?
India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भारताने तयारी सुरु केली आहे. दिल्लीत महत्त्वाच्या ठिकाणी मॉकड्रील.

India Pakistan War: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध (India Pakistan War) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 7 मे रोजी सराव (Mock Drill) होणार असून शत्रूने हल्ला केल्यास नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढवण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सर्वसामान्य नागरिकांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. केंद्र सरकारने मॉकड्रीलचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये विमानाचा, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनचा हल्ला (Air strike) होण्याची शक्यता असलेल्या परिसरात ब्लॅकआऊट केले जाते. लष्करी तळ असलेल्या भागात हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण असते. मात्र, नागरी भागात एअर डिफेन्स नसतो. त्यामुळे हल्ला झाल्यास नागरिकांना स्वत:च संरक्षण करावे लागते. त्यादृष्टीने ही मॉकड्रील अत्यंत महत्त्वाची असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत. कारण लाईट सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे. जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय, नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत. जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. याशिवाय, हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरुन जाऊ नये, यासाठी मॉकड्रील महत्त्वाची असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
India Mock Drills: विनाकारण कोणतेही धाडस करणे टाळा- ब्रिगेडिअर हेमंत महाजन
यावेळी निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी 1971 च्या भारत-पाक लढाईतील एक आठवण सांगितली. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला होता. त्यावेली अँटी एअरक्राफ्ट गनने गोळीबार सुरु होता. यावेळी अँटी एअरक्राफ्ट गनचे कवच (शेलिंग) खाली पडत होते. ते गोळा करायला झोपडपट्टीतील काही लोक बाहेर पडले. मात्र, या नादात त्यांचा जळून मृत्यू झाला होता. त्यामुळे हवाई हल्ल्याच्यावेळी असे कोणतेही धाडस करु नका, असा सल्ला ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी दिला.
आणखी वाचा
शाहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हातातलं खेळणं बनवणारा असीम मुनीर कोण?























